सांगली (प्रतिनिधी) - वृत्तपत्र विक्रेत्यासह या क्षेत्रातील इतर घटकासहित त्वरित वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी; याची घोषणा चालू पावसाळी अधिवेशनात न केल्यास कामगार मंत्र्याच्या घरासमोर घेराव घालून निदर्शने करण्याचा ठराव पश्चिम महाराष्ट्र वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या बैठकीत सांगली येथे घेण्यात आला. जर वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाचे अंमलबजावणी न झाल्यास यापुढे ज्या ज्या वृत्तपत्रात शासनाच्या अर्ध पान, पूर्ण पान जाहिरात असतील तो अंक त्या दिवशी वितरित करण्याचा नाही असाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला. याकरता वृत्तपत्र विक्रेत्यांनी एकजुटीने कामाला लागावें असे कळकळीचे आवाहन ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते कामगार कल्याणकारी मंडळाचे प्रणेते शिवगंगा खोत यांनी केले.
सांगली येथे विश्रामगृहाचे राज्यकार्यकारणी सदस्यासह सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि जिल्ह्यातील पदाधिकारी यांची बैठक राज्य संघटनेचे सल्लागार शिवगोंडा खोत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी वरील निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. आत्तापर्यंत शासनाने इतर समाजातील घटकांसाठी कामगार कल्याण मंडळाची स्थापना केली परंतु वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाबाबत शासनाने उदासीन धोरण दाखवल्याने यावर विचार विनिमय करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील आमदार खासदार शासकीय कार्यालय शासकीय अधिकारी यांना देण्यात येणारे वृत्तपत्रही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या सर्व गोष्टी टप्प्याटप्प्याने करण्याचे ठरले. तसेच ज्या वृत्तपत्रांमध्ये शासनाच्या पूर्ण पान, अर्धपण जाहिरात असतील तो अंक पूर्णपणे वितरित करण्याचा नाही यासंदर्भात मागण्यासह निवेदन जिल्हास्तरावर तालुकास्तरावर ज्या ठिकाणी माहिती आणि जनसंपर्क कार्यालय. माहिती कार्यालय असतील तेथील अधिकाऱ्यांना निवेदने देण्याचे या बैठकीत ठरले.
मार्गदर्शन करताना कामगार कल्याणकारी मंडळ आहे त्याप्रमाणे वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ स्थापन करावे या मागणीकरता राज्यभर एकाच वेळी आंदोलने करावीत असेच सांगून ते म्हणाले संघटन मजबूत करून संघटनेने आपल्या मागण्यासाठी लढा देऊन आंदोलन तीव्र करण्याचे आवाहन केले. नांदेड येथील झालेल्या बैठकीचा वृत्तांत या बैठकीत वाचून दाखवण्यात येऊन त्यावर चर्चा झाली. वृत्तपत्र विक्रेता संघटनांनी संबंधित वृत्तपत्राशी निगडित असलेल्या लोकांना सभासद करून जे वृत्तपत्र विक्रेते अद्याप पर्यंत संघटनेचे सभासद झाले नाहीत त्यांनी संघटनेचे सभासद त्वरित होऊन संघटनेला सहकार्य करावे असेही सांगितले.
शासनाच्या कामगार विभागाचे सचिव व अधिकारी संघटनेचे पदाधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीमध्ये वृत्तपत्र विक्री याचे स्वरूप कार्याची पद्धत याबाबत सविस्तर चर्चा होऊन शिफारस करण्यात आली होती. त्याचा गांभीर्याने विचार करावा व कामगाराप्रमाणे वृत्तपत्र कल्याणकारी मंडळाची स्थापना करून राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा या बैठकीत सर्वांनी व्यक्त केली. पश्चिम महाराष्ट्रातील आलेल्या वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत व प्रास्ताविक राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन घोरपडे यांनी केले. राज्य उपाध्यक्ष रघुनाथ कांबळे यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांनी रस्त्यावर उतरून शासनाला जाग आणल्याशिवाय पर्याय नाही असे सांगितले. या बैठकीला संघटन सचिव शाम थोरात, माजी कोषाध्यक्ष गोरख भिलारे, अण्णा मुंडे, राजेंद्र माळी हे प्रमुख होते . या बैठकीत जो निर्णय झाला त्याची अंमबजावणी व सदस्य नोंदणीचे काम हाती घ्यावे असे खोत यांनी सांगितले. कोल्हापूर जिल्हाध्यक्ष किरण वं. मुळे तसेच नवलाई सोलापूर जिल्हा अध्यक्ष शिवलिंग मेडेगिरी, उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे, सचिव बंटी बाबर, कार्याध्यक्ष अरुण कोरे सावंत यांच्यासह उत्तम चौगुले, रविराज शेटे, सागर घोरपडे व सांगली मिरज कोल्हापूर सातारा कराड हातकणंगले आदी भागातील वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.