श्रीक्षेत्र पंढरपूर (प्रतिनिधी) - श्रीक्षेत्र पंढरी नगरीत अधिक श्रावण मासानिमित्त लाखो भाविकांची मांदियाळी दररोज जमत आहे. चंद्रभागा स्नान, पुंडलिकाचे दर्शन, नामदेव पायरीचे दर्शन, मंदिर प्रदक्षिणा, कळसाचे दर्शन हा वारकरी भाविकांचा नित्यनेम आहे. त्यामुळे मंदिर परिसरात भाविकांचा महापूर आलेला दिसत आहे.
अधिक श्रावण मासानिमित्त मंदिर परिसरातील मित्र मंडळी, व्यापारी, सहकारी, सुहृद यांच्या अनमोल सहकार्यातून पंढरी नगरीत विठ्ठल दर्शनार्थ आलेल्या वारकरी - भाविक - भक्तांसाठी नित्य अन्नदान सेवा श्रीसंत प्रल्हाद महाराज बडवे मंदिराजवळ होत आहे. ही अन्नदान सेवा दररोज दुपारी होत आहे.
मंदिर परिसरातील मंडळींनी भाविकांच्या अन्नदान सेवेसाठी केलेला हा उपक्रम अगदी स्तुत्य व कौतुकास्पद असल्याचे भाविक वारकरी भक्तातून बोलले जात आहे.