लायन्स क्लबच्या नूतन सभासदांचा पदग्रहण समारंभ

0


पंढरपूर (प्रतिनिधी) : पंढरपूर लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी आरती बसवंती यांची निवड करण्यात आली असून, या क्लबमध्ये काही नवीन सभासदांचीही निवड करण्यात आली, या सर्वच पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण आणि शपथविधी सोहळा, पंढरीतील शिवयोगी मंगल कार्यालयात शुक्रवारी मोठ्या थाटात पार पडला. याप्रसंगी शहरातील लायन्स आणि लायनेस क्लबचे सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


   याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख महेश साठे, महिला नेत्या सीमा परिचारक, विनया परिचारक, प्रणिता भालके, माजी नगरसेविका श्वेता डोंबे, माजी नगरसेवक विवेक परदेशी, प्रशांत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

   लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल आणि मल्टिपल कौन्सिलचे व्हॉइस चेअरमन राजशेखर कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा पदग्रहण सोहळा पार पडला. लायन्स क्लबचे रीजन चेअरमन राजेंद्र शहा कांसवा यांनी नवीन सभासदांना व्यक्तिगत आणि सामूहिक शपथ दिली. यावेळी लायन्स क्लबचे झोन ४ चे चेअरमन चंद्रकांत यादव हे उपस्थित होते.

नूतन अध्यक्ष सौ.बसवंतीआणि सचिव बसवंती दांपत्यावर अभिनंदनाचा वर्षाव 
   राजेंद्र शहा यांनी याप्रसंगी लायन्स क्लबचा इतिहास उपस्थितांना समजावून सांगितला. 'आम्ही सेवावृत्ती' हे ब्रीद घेऊन काम करणारी लायन्स क्लब ही सामाजिक संघटना जगातील २१० देशात काम करत असून, या संघटनेचे जगभरात १४ लाख सदस्य आहेत. सन १९१७ साली देशात लायन्स क्लबचे काम सुरू झाले. सोलापूर जिल्ह्यात १९६० साली ही संघटना स्थापन झाली. ही बिगर राजकीय सामाजिक संस्था असून, समाजोपयोगी गुण ओळखूनच लायन्स क्लबमध्ये सदस्यत्व दिले जाते. सामाजिक कार्य करण्यासाठी संघटनात्मक प्रयत्न केले जातात. आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्था असून, सामाजिक कार्याची आवड असलेल्या नागरिकांना या संघटनेचे सदस्यत्व दिले जाते. या लायन्स क्लबचा पदग्रहण सोहळा राजशेखर कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी सर्वच सदस्यांना त्यांची कर्तव्य बजावून लायन्स क्लबचे नावलौकिक वाढवावे असे ते म्हणाले.

लायन्स क्लबचे नूतन अध्यक्ष आरती बसवंती आणि सचिव ओंकार बसवंती यांनाही यावेळी त्यांच्या पदांची जबाबदारी सांगण्यात आली. या क्लबच्या नूतन अध्यक्षपदी आरती बसवंती यांची निवड करण्यात आली असून, त्यांच्या कारकिर्दीत चांगले काम होणार असल्याची अपेक्षा राजशेखर कापसे यांनी यावेळी व्यक्त केली.

नूतन अध्यक्ष सौ.बसवंती आणि सचिव बसवंती दांपत्याचे अभिनंदन याप्रसंगी सर्वच उपस्थितांकडून करण्यात आले. पंढरपूर शहरातील अनेक मान्यवर नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करण्यास हजेरीही लावली होती. यामध्ये शहरातील डॉक्टर्स, वकील, आर्किटेक्ट, बांधकाम व्यवसायिक यांच्यासह समाजसेवकांचाही सहभाग होता.

या कार्यक्रमास लायन्स क्लबचे पदाधिकारी राजीव कटेकर, लायन्स क्लबचे माजी सचिव डॉ. अश्विनी परदेशी, माजी कोषाध्यक्ष सुमित गडम, कैलास करंडे, शकील सौदागर, शोभा गुप्ता यांच्यासह शहरातील इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)