पंढरपूर (प्रतिनिधी) - येथील कृष्णा धोत्रे या बालकाच्या हत्येप्रकरणी सी. आय. डी. चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी आखिल महाराष्ट्र वडार समाज संघटना यांच्या वतीने पंढरपूर शहर पोलिस ठाण्यासमोर सोमवार दि.३१ जुलै रोजी बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
संत पेठ भागात राहणाऱ्या कृष्णा तिम्मा धोत्रे या केवळ ७ वर्षाच्या बालकाची ६ महिन्यांपूर्वी अत्यंत क्रूर, अमानवीय पद्धतीने हत्या करण्यात आली होती.
एवढे दिवस उलटूनही पोलिसांना या हत्येप्रकरणी गुन्हेगार सापडत नाहीत, यासाठी सी. आय. डी. चौकशी करून तपास करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
हा नरबळी चा प्रकार असून पोलिसांना खरे आरोपी कोण आहेत? हे ठाऊक असूनही दबावापोटी अथवा अन्य कारणास्तव आरोपींना अटक केली जात नाही असे धोत्रे कुटुंबीयांचे म्हणणे,व त्यांना विश्वासात न घेता, पोलिस आकस्मिक मृत्यू असे नोंद करून हा गुन्हा दडपण्याचा प्रयत्न करीत आहेत असे आंदोलकांचे म्हणणे आहे.
या प्रकरणी आमच्या मागण्या मान्य न झाल्यास सोमवार दि ३१ जुलै पासून बेमुदत धरणे आंदोलन केले जाईल असा इशारा आखिल महाराष्ट्र वडार समाज संघटना यांच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष, टेंभुर्णी येथील राजकुमार धोत्रे, रामा धोत्रे, सचिन बंदपट्टे, महेश पवार, महावीर वजाळे, राधा धोत्रे, लक्ष्मी धोत्रे, निता बंदपट्टे, रेश्मा धोत्रे तसेच वडार समाजातील शेकडो युवक उपस्थित होते.