पालखीमार्ग व पंढरपूरच्या महाशिबिरात ११ लाख ६४ हजार ६८४ भाविकांना मोफत आरोग्य सुविधा

0
आरोग्याची वारी पंढरीच्या दारी

आरोग्य उपसंचालक डॉ.राधाकिशन पवार यांची माहिती

पंढरपूर (प्रतिनिधी) - आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपूरकडे निघालेल्या दिंड्यांमधल्या वारकर्‍यांना  आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात तसेच पंढरपूर येथील महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून तपासण्या व उपचार  उपलब्ध व्हावेत यासाठी आरोग्य  विभागाकडून ‘आरोग्याची वारी - पंढरीच्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात आला. या माध्यमातून पालखी मार्ग तसेच पंढरपूर येथील महाआरोग्य शिबिरद्वारे 11 लाख 64 हजार 684 वारकर्‍यांना मोफत आरोग्य सुविधा देण्यात आल्या असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक राधाकिशन पवार यांनी दिली.
आषाढी वारी 2023 साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली देहू - आळंदी ते पंढरपुर पर्यंत आरोग्य विभागामार्फत मोफत आरोग्य विषयक सेवा पुरविण्यात आल्या तसेच पंढरपूर येथे 27 ते 30 जून  या कालावधीत वाखरी, गोपाळपूर, तीन रस्ता येथे महाआरोग्य शिबिरं घेण्यात आली.  याबरोबरच वाळवंटात 3 व 65 एकर येथे 2 तर पंढरपूर शहरामध्ये 17  असे एकूण 20 ठिकाणी हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या माध्यमातून आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यात आल्या.
देहू-आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गावर एकूण 6 लाख 64 हजार 607 वारकर्‍यांना मोफत तपासणी व उपचार देण्यात आले. पालखी मार्गावर प्रत्येकी दोन किलोमीटर अंतरावर तात्पुरता आपला दवाखाना या माध्यमातून आरोग्य सेवा पुरविण्यात आल्या. तसेच 194 रुग्णवाहिकांमार्फत आरोग्य सेवा पुरविण्यात आली.
अत्यावश्यक रुग्णसेवेसाठी  75 रुग्णवाहिका तैनात होत्या या मार्फत 19 हजार 853 वारकर्‍यांना सेवा देण्यात आली. त्यापैकी 847 अत्यावश्यक वारकर्‍यांना योग्यवेळी उपचार व संदर्भ सेवा मिळाल्याने प्राण वाचले आहे. त्यामुळे मृत्यूंच्या प्रमाणात घट झाली.  आरोग्यदुतांमार्फत 124 बाईक अँम्बुलन्सने पालखी मार्गावर आरोग्य सेवा दिली. पुणे परिमंडळ व पुणे जिल्हा परिषदस्तरावरुन पालखी बरोबर 9 आरोग्य पथके अविरत पालखी माघारी जाईपर्यंत कार्यरत आहेत. आरोग्य उपसंचालक डॉ.पवार यांनी सांगितले.
वारकरी भाविकांना एकाच ठिकाणी आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आषाढी वारीकाळात पंढरपूर येथे वाखरी, गोपाळपूर तीन रस्ता येथे  27 ते 30 जून  या कालावधीत  महाआरोग्य शिबिरे घेण्यात आली होती. या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून पाच लाख 77 हजार भाविकांना रुग्णसेवा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे आरोग्य संचालक डॉ.राधाकृष्ण पवार यांनी सांगितले.
अतिदक्षता विभाग कक्षामार्फत 154 वारकर्‍यांना तसेच 4 हजार 217  वारकर्‍यांना आंतररुग्ण विभागात आरोग्य सुविधा देण्यात आली.  या शिबिरात 40 प्रकारच्या रुग्णांच्या मोफत प्रयोगशाळा तपासण्या पूर्ण केल्या असून, रुग्णांचा प्रयोगशाळा तपासणीचा अहवाल रुग्णांच्या मोबाईलवर देण्यात आलेला आहे. रुग्णांना अति विशेषतज्ज्ञ मार्फत ऑन्कोलॉजी, न्युरोसर्जरी, गॅस्टोईट्रॉलॉजी यासारख्या वैद्यकीय सेवा मोफत पुरविण्यात आलेल्या आहेत. मोफत नेत्र तपासणी करून 77 हजार 854 चष्मे वाटप करण्यात आले. तसेच मोतीबिंदू झालेल्या रुग्णांची यादी करुन मोफत शासकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शिबिराच्या ठिकाणी 5 बेड मनुष्यबळासह अतिदक्षता विभाग कार्यरत होते, त्यामध्ये 154 रुग्णांना सेवा दिली व वारकर्‍यांचे प्राण वाचविण्यात आले. तसेच अत्याधुनिक रेडिओ डायग्नॉस्टिक सुविधा, यामध्ये सोनोग्राफी सुविधा उपलब्ध करण्यात आली होती, असेही डॉ. पवार यांनी सांगितले
या महाशिबिरातून नेत्रविकार, हृदयरोग, किडनी, पोटाचे विकार, त्वचेचे विकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, त्वचारोग, दंतरोग, संसर्गजन्य रोग, कॅन्सर या सारख्या रोगावर मोफत उपचार केलेले आहेत. ज्या वारकर्‍यांना शस्त्रक्रिया व सुपरस्पेशालिटी सेवाची आवश्यक्ता होती, त्यांची यादी करण्यात आली असून या सर्वांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
महाआरोग्य शिबिामध्ये विषयतज्ज्ञ, एमबीबीएस व पॅरामेडिकल स्टाफ यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 3 हजार 718 व एक हजार खासगी वैद्यकीय व्यावसायिक  तसेच भैरवनाथ शुगर्स व जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे  1 हजार 500 स्वयंसेवक अशा एकूण 6 हजार 218 मनुष्यबळामार्फत मोफत आरोग्य सेवा पुरविण्यात आली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)