केसीआर पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर

0

पंढरपूर (प्रतिनिधी) :- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव (केसीआर) पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. केसीआर, अण्णाभाऊ साठे यांच्या सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या जन्मगावी १ ऑगस्ट रोजी भेट देतील. अण्णाभाऊ साठे यांच्या कुटुंबातील सचिन साठे यांच्या निमंत्रणावरून केसीआर वाटेगावला भेट देणार आहेत. बीआरएसचे महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी याबाबत माहिती दिली.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून गरीबांचे, दलितांचे आणि शोषितांचे प्रश्न मांडले होते. भारत राष्ट्र समिती पक्षदेखील या घटकांच्या उद्धारासाठी काम करत आहे. त्यामुळे केसीआर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मगावी भेट देणार आहेत.    
आषाढी एकादशीनिमित्त गेल्याच महिन्यात पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी के. चंद्रशेखर राव त्यांच्या संपूर्ण मंत्रीमंडळासह जवळपास ५०० ते ६०० गाड्यांचा ताफा घेवून पंढरपूरला आले होते. त्यानंतर केसीआर यांनी तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेचंही दर्शन घेतलं होतं. या दौऱ्यात पंढरपूर येथील माजी आमदार स्वर्गीय भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांनी भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला होता.
महाराष्ट्रात भारत राष्ट्र समिती पक्षात सध्या जोरदार इनकमिंग सुरु आहे. विविध पक्षातील नेते, कार्यकर्ते माजी आमदार खासदार बीआरएस मध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे केसीआर यांच्या आगामी महाराष्ट्र दौऱ्यात कोणकोणते नेते बीआरएस मध्ये प्रवेश करतात याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)