श्री विठ्ठल कारखान्याच्या वतीने ऊस पिक परिसंवाद संपन्न

0
पंढरपूर दि. २३ (प्रतिनिधी) - श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. श्री. अभिजीत धनंजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली कारखान्याचे वतीने सद्गुरु मंगल कार्यालय, वाखरी, ता. पंढरपूर येथे  पहिल्या सत्रामध्ये कृषीरत्न मा. श्री डॉ. संजीवदादा माने ऊस तज्ञ कृषिभूषण व मा. श्री. भागवत सरडे तालुका कृषि अधिकारी, मंगळवेढा व मा. श्री सुर्यकांत मोरे, तालुका कृषि अधिकारी, पंढरपूर यांचे उपस्थितीत ऊस पिक परिसंवाद २०२३ संपन्न झाला. याप्रसंगी श्री विठ्ठल प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या शुभहस्ते करून कार्यक्रमास सुरुवात झाली. तसेच दुसऱ्या सत्रामध्ये मा. श्री पंजाबराव डख, हवामान अभ्यासक यांचे हवामान आधारित ऊस शेती यावर व्याख्यान पार पडले.
सदर प्रसंगी श्री भागवत सरडे तालुका कृषि अधिकारी मंगळवेढा हे बोलताना म्हणाले की, पाच एकरापेक्षा कमी शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना फळबागांची लागवड करावयाची असेल, तर त्यांनी जॉबकार्ड काढून सदर योजनेच्या माहितीसाठी आपल्या गांवातील कृषि सहाय्यक यांचेशी संपर्क करून या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच सध्याचे बदलते हवामान पाहता पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये जे पिक पेरलेले आहे, त्याचा त्वरीत पिक विमा घेणे अत्यंत गरजेचे आहे. उजनी लाभक्षेत्रामध्ये संपुर्ण पंढरपूर तालुक्याचे क्षेत्र येत असल्यामुळे येथे ऊसाचे क्षेत्र मोठ्याप्रमाणात आहे. शेतकन्यांनी ऊसाचे पिक घेतांना कमी खर्चामध्ये ऊन शेतीमधून जास्त उत्पन्न कसे मिळवता येईल यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पन्न वाढविण्यावर भर द्यावा. तसेच याबाबत कोणतीही अडचण आल्यास माइयाशी संपर्क करावा असे ते म्हणाले.
याप्रसंगी कृषिरत्न डॉ. श्री संजीवदादा माने मार्गदर्शन करताना म्हणाले की, श्री विठ्ठल कारखाना २ हंगाम बंद असूनही अल्पावधीत कारखाना चालु करून ७ लाखाहून अधिक गाळप केलेमुळे कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीतआबा पाटील यांचे कौतुक केले. यापूर्वी कै. बाबुराव फाळके हे सर्वात जुने कृषितज्ञ होते. त्यांचे मार्गदर्शनानुसार ऊसाचे पिक घेतले जात होते व पाडेगांव, व्ही. एस. आय. पुणे, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अशा ठिकाणी जाऊन ऊस तज्ञांबरोबर चर्चासत्र घडवून आणून त्यांचे मार्गदर्शन घेण्यात येत होते. व्ही. एस. आय पुणे यांच्या नव-नवीन संशोधनामुळे शेतकन्यांचे एकरी १०० मे. टनापेक्षा जादा उत्पन्न निघू लागले. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एकरी १०० मे. टनापेक्षा जादा उत्पन्न मिळविणेसाठी शेतकऱ्यांना सर्वतोपरी माहिती देणेस मी तयार असल्याचे सांगितले.

तसेच यावर्षी उन्हाळ्यामध्ये ऊस पिकांना पाण्याची कमतरता भासल्यामुळे ऊसाला कमी फुटवे ऊसाची कमी वाढ, हवामानातील बदल यामुळे एकरी ऊस उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता आहे. परंतु सध्या पाऊस चांगला पडत असल्यामुळे ऊस वाढणेसाठी सध्याचे हवामान अनुकूल असून शेतकऱ्यांनी खताची योग्य मात्रा देऊन ऊसाची वाढ करणेसाठी वाव आहे. तसेच सर्व शेतकऱ्यानी ८६०३२ या जातीचे बेणेची निवड करून जास्तीत जास्त लागण केल्यास त्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन मिळून कारखान्याचीही रिकव्हरी वाढणेस मदत होते.

ऊसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळविणेसाठी पुढील ५ नियमांचा वापर केल्यास शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळून आर्थिक फायदा होणार आहे. १) जमीनीची सुपिकता, २) ऊस लागणीची योग्य पध्दत, ३) रासायनिक खताची योग्य मात्रा, ४) पाण्याचे योग्य व्यवस्थापन व ५) पिक संरक्षण याबाबत त्यांनी विस्तृतपणे शेतकऱ्यांना पटेल, समजेल या भाषेमध्ये माहिती दिली.

सदर प्रसंगी हवामान अभ्यासक श्री. पंजाबराव डख यांनी सध्याच्या बदलत्या हवामानाचा अंदाज सांगितला. पूर्वी आपल्याकडे पाऊस कमी पडत होता व मुंबईसह कोकणामध्ये जादा पाऊस पडत होता. २५ जुलै नंतर चक्रीवादळ निर्माण होवून त्याचा आपल्या जिल्हयामध्ये पाऊस पडण्यास फायदा होणार असल्याचे सांगितले. सोलापूर जिल्ह्याची वरदायीनी असणारे उजनी धरण भरेल असाही त्यांनी अंदाज व्यक्त केला. यावेळी त्यांनी अनेक उदाहरणे देऊन कोणत्या वेळी किती पाऊस पडेल याचा अंदाज सांगितला.
यावेळी कारखान्याचे चेअरमन श्री. अभिजीत (आबा) पाटील म्हणाले की, सुरुवातीपासून आपल्या जिल्ह्यामध्ये पाऊसमान कमी असल्यामुळे ऊस पिकांवर त्याचा परिणाम होवून उत्पादन कमी निघणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु सध्या आपल्या तालुक्यामध्ये चांगला पाऊसमान होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी खचून न जाता ऊसाचे वाढीसाठी आपल्याला या परिसंवादामध्ये ऊस तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे योग्य ते खत, पाणी वापरून ऊसाचे उत्पन्नात वाढ कशी होईल याकडे लक्ष दयावे. गतवर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये साखर कारखान्यामधून साखरेचे कमी उत्पादन झाल्यामुळे अंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये साखरेला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढलेली आहे. त्यामुळे सध्या साखरेचे दर वाढू लागलेले आहेत. साखरेचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांना एफ.आर.पी. प्रमाणे बिल देणे कारखान्यांना सोईस्कर झालेले आहे, परंतु केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे साखर निर्यात न झाल्यामुळे साखरेचे दर स्थिरच आहेत. परंतु प्रत्यक्ष परिस्थिती अशी आहे की, अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सध्या केंद्र शासनाने २०२३-२४ हंगामासाठी एफ.आर.पी.रु.३१५०/- जाहीर केलेली असून प्रत्यक्षात साखरेचे दरामध्ये वाढ केलेली नाही. त्यामुळे साखर कारखान्यांना एफ.आर.पी. प्रमाणे शेतकऱ्यांना बिल देणेस अडचणी निर्माण होत आहेत. तसेच सध्या इथेनॉल उत्पादनाची कारखान्यास गरज असून सदरचे प्रकल्प उभा करणेसाठी शासनाने मंजुरी दिलेली आहे, परंतु सदर प्रकल्प उभा करणेसाठी बँका कर्ज देणेस टाळाटाळ करीत आहेत. पुढील गाळप हंगामामध्ये आपले संचालक मंडळाने १० लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठेवलेले असून रू. २५००/- च्या पुढे ऊसास पहिला हप्ता मिळू शकतो असे याप्रसंगी नमुद केले. डॉ. श्री संजीवदादा माने यांना विनंती केली की, आपण आमच्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील काही गांवे दत्तक घेऊन एकरी १०० मे. टनापेक्षा जादा उत्पादन घेणेसाठी शेतकऱ्यांना तसे मार्गदर्शन करावे. पुढील गळीत हंगामापासून एकरी १00 मे.टन ऊसाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना "श्री विठ्ठल पुरस्कार" देऊन गौरविण्यात येणार आहे व कारखान्याचे जे चांगले काम करणारे गुणवंत कामगार असतील त्यांनाही हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याचेही सांगितले. तसेच येत्या हंगामामध्ये आपल्या कारखान्याला जास्तीत जास्त ऊस गळीतास देण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले.

मागील गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये सर्वाधिक ऊस पुरवठा करणारे श्री सुभाष जयराम पवार गुरसाळे ९२४.९६३ मे. टन, श्री संतोष मुरलीधर घाडगे, देगांव ७४८.९५३ मे. टन, श्री नारायण त्रिंबक पाटील, गुरसाळे ७४६.४९७ मे.टन या ऊस उत्पादक सभासदांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमासाठी स्वागत व परिचय कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री डी. आर. गायकवाड यांनी केले तर प्रास्ताविक कारखान्याचे संचालक श्री तुकाराम मस्के सर यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन कारखान्याचे संचालक श्री सचिन शिंदे-पाटील यांनी केले व सुत्र संचालन कारखान्याचे लिगल ऑफिसर श्री ओ. जे. अवधुत व उप शेती अधिकारी श्री नितीन पवार यांनी केले. याप्रसंगी कारखान्याचे मार्गदर्शक स्वेरीचे संस्थापक सचिव श्री बी. पी. रोंगे सर, कारखान्याचे व्हा. चेअरमन सौ. प्रेमलता रोंगे, राष्ट्रवादीचे मा. ता. अध्यक्ष अॅड. दिपक पवार, मनसे नेते श्री दिलीप धोत्रे, कारखान्याचे संचालक सर्वश्री संभाजी भोसले, कालिदास पाटील, दिनकर चव्हाण, सुरेश भुसे, बाळासाहेब हाके, धनंजय काळे, साहेबराव नागणे, कालिदास साळुंखे, सचिन वाधाटे, जनक भोसले, प्रविण कोळेकर, नवनाथ नाईकनवरे, सिताराम गवळी, अशोक जाधव, सिध्देश्वर बंडगर, महेश खटके, विठ्ठल रणदिवे तसेच तज्ञ संचालक सर्वश्री दशरथ जाधव, अशोक तोंडले तसेच निमंत्रित संचालक सर्वश्री धनाजी खरात, तानाजी बागल, बाळु मोरे, अंगद चिखलकर, अशोक घाडगे, गणेश ननवरे, समाधान गाजरे यांचेसह कारखान्याचे कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक, कार्यकर्ते व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)