'शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रत्येक विभागाने दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी -जिल्हाधिकारी

0
शासन आपल्या दारी हा उपक्रम पंढरपूर येथे दि. 10 सप्टेंबर 2023 रोजी होणार.....

सोलापूर जिल्ह्याच्या 11 तालुक्यातील एकूण 30 ते 35 हजार लाभार्थी पंढरपूर येथील कार्यक्रमासाठी आणण्याचे प्रशासनाचे नियोजन सुरू

कार्यक्रमाच्या ठिकाणी लाभार्थ्यांना त्यांच्या घरापासून आणणे व पुन्हा त्यांच्या घरापर्यंत सोडणे यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस चा वापर करण्यात येणार

जिल्ह्यातील एक ही पात्र लाभार्थी शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी त्यांच्या स्तरावरून दक्षता घ्यावी

कार्यक्रमाच्या ठिकाणी शासकीय योजनांची माहिती देणारे विविध विभागाचे 50 स्टॉल लावले जाणार
सोलापूर, दि. 21 (जिमाका):- जिल्ह्यात 'शासन आपल्या दारी' या राज्य शासनाच्या महत्त्वकांक्षी उपक्रमाचे दिनांक 10 सप्टेंबर 2023 रोजी आयोजन करण्यात येत आहे. तरी सर्व शासकीय विभाग व अधिनस्त सर्व अधिकारी कर्मचारी यांनी अधिक गतिमान पद्धतीने काम करून जिल्ह्याला देण्यात आलेल्या 75 हजार लाभार्थी निवडीच्या उद्दिष्टापेक्षा अधिक लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी प्रयत्न करावेत. व हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रत्येक विभागप्रमुखाला देण्यात आलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
      जिल्हाधिकारी कार्यालयातील  सभागृहात 'शासन आपल्या दारी' उपक्रमाच्या पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करत होते. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, मुख्यमंत्री सचिवालयाचे डॉ. धीरज चव्हाण, उपजिल्हाधिकारी  सर्वश्री विठ्ठल उदमले, गजानन गुरव, अभिजीत पाटील, जिल्हा पुनर्वसन अधिकारी सोपान टोम्पे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री. काटकर यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
      जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पुढे म्हणाले की, सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी जिल्हास्तरावरून त्यांना देण्यात आलेले उद्दिष्ट प्रत्येक तालुक्यातील विभागाकडून पूर्ण करून घ्यावे. तसेच संबंधित शासकीय योजनांच्या लाभार्थ्याचे नाव, मोबाईल क्रमांक व संपूर्ण पत्त्यासह यादी तयार करावी. तसेच त्या बाबत फेर पडताळणी करावी. लाभार्थी हा दिनांक 1 एप्रिल ते 10 सप्टेंबर 2023 या कालावधीतील शासकीय योजनांचा लाभ मिळालेलाच असावा. या कालावधीतील एकही पात्र लाभार्थी शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
      ‘शासन आपल्या दारी’चा जिल्हास्तरावरील मुख्य कार्यक्रम पंढरपूर येथे घेण्याची नियोजित असल्याने या ठिकाणी जिल्हाभरातून शासकीय योजनेचे लाभार्थी त्यांच्या गावातून आणणे व कार्यक्रम झाल्यानंतर त्यांच्या गावापर्यंत पोहोचवणे यासाठी वाहतूक व्यवस्थेचे सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. यासाठी आवश्यक असलेल्या बसेसची व्यवस्था राज्य परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे. सध्या त्यांनी 465 बसेसची संख्या कळवली असली तरी किमान 30 ते 35 हजार लाभार्थी या कार्यक्रमासाठी येणार असल्याने किमान 700 ते 750 बसेस आवश्यक राहतील या दृष्टीने राज्य परिवहन विभागाचे विभागीय नियंत्रक यांनी सुस्थितीतील बसेस उपलब्ध करून द्याव्यात. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्यात आलेली असून प्रत्येक विषयानुसार समितीची रचना केलेली आहे. तरी प्रत्येक विभाग प्रमुखांनी दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.      
      ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राज्य शासनाचा अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. आता  पर्यंत पंधरा -सोळा जिल्ह्यात हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडलेला आहे. प्रत्येक जिल्ह्याला 75 हजार लाभार्थी निवडीचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यात अकरा तालुके असून, प्रत्येक तालुक्यातून 15 हजार लाभार्थी निवडण्याच्या अनुषंगाने प्रशासनाने नियोजन करावे. लाभार्थ्यांचे ने आण करण्याची चांगली व्यवस्था करावी. कार्यक्रमाच्या ठिकाणी आरोग्यवस्था उत्तम ठेवावी. कार्यक्रमाच्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्याला एक रोपटे देण्यात येणार आहे, तरी सामाजिक वनीकरण विभागाने याबाबत योग्य ती दक्षता घेवून नियोजन करावे, अशा सूचना मुख्यमंत्री सचिवालयाचे विशेष कार्य अधिकारी राहुल देशपांडे यांनी दुरदृष्य प्रणालीद्वारे दिल्या. 
      तर मुख्यमंत्री सचिवलयाकडून शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केलेले डॉ. धीरज चव्हाण यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी लाभार्थ्याच्या संख्येनुसार हिरकणी कक्ष स्थापित करावेत याबाबत आरोग्य विभागाने काळजी घ्यावी असे सांगितले. लाभार्थ्यांची माहिती नाव,  मोबाईल क्रमांक व संपूर्ण पत्त्यासह यादी तयार करून मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवावी. लाभार्थ्यांची संख्या निश्चित करून त्यांना शासकीय योजनांचा देण्यात आलेल्या लाभाची आकडेवारीसह माहिती द्यावी. त्याप्रमाणेच कार्यक्रमाच्या ठिकाणी किमान शासकीय योजनांची माहिती देणारे 50 स्टॉल लावावेत अशा सूचना त्यांनी दिल्या.  
  प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच जिल्हास्तरावर गठीत करण्यात आलेल्या समितीची माहिती देऊन प्रत्येक विभागाला देण्यात आलेल्या जबाबदारी विषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी तहसीलदार, गटविकास अधिकारी व अन्य विभाग प्रमुख दूरदृष्य प्रणालीव्दारे उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)