पंढरीत अधिक महिन्यात विठ्ठल दर्शनाला मोठी गर्दी
श्रीक्षेत्र पंढरपूर (प्रतिनिधी) :- अवघ्या महाराष्ट्राचे तसेच संपूर्ण वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या श्रीविठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी प्रत्येक वारकरी आसुसलेला असतो. मात्र पंढरीत दोन व्यक्तींना विठ्ठलाचे दर्शन करून देण्यासाठी दोन हजार रुपये घेतल्याची घटना शहर पोलीस कॉन्स्टेबल वामन यलमार यांच्या निदर्शनास आल्यानंतर मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी संबंधितावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगितले.
वारकरी संप्रदायामध्ये सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. तिरुपती बालाजी सह इतर देवस्थान मध्ये देवाचे दर्शन लांबून होते परंतु पंढरपुरात चरण दर्शन होत असल्याने भाविकांना एक आत्मीय समाधान लाभते. यासाठीच या ठिकाणी महाराष्ट्रसह देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात. सध्या अधिक महिना असल्याने पंढरपूर मध्ये विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असून भाविकांना दर्शनासाठी सहा ते सात तास लागत आहेत. लवकर दर्शन होण्याच्या मोहा पायी काहीजण एका व्यक्तीला एक हजार रुपये असे घेऊन भाविकांना दर्शन घडवून आणतात अशी चर्चा काही दिवसापूर्वी पंढरपुरात सुरू असतानाच आज पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल वामन यलमार यांनी पंढरपुरातील बडवे व उत्पात या दोन संशयित एजन्ट मार्फत हैदराबाद येथील दोन भाविक दर्शनासाठी आले असल्याचे मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या निदर्शनास आणून दिले. दरम्यान व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार संबंधितावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. त्याचबरोबर कोणालाही पाठीशी घालणार नाही, यामध्ये कोणाकोणाचे लागेबांधे आहेत हे पोलीस चौकशीत निष्पन्न होणारच असून सदर घटनेबाबत वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापकांनी माध्यमांना दिली.
यापूर्वीही श्रीविठ्ठलाचे दर्शनासाठी पैसे घेऊन भाविकांना सोडण्याचे प्रकार निदर्शनास आले होते. पोलिसात गुन्हेही दाखल झाले होते. परंतु अशा घटनेवर लगाम लागणार का? असा प्रश्न भाविकातून उपस्थित केला जात आहे. तर मंदिर परिसरात असलेले व्यापारी तसेच नागरीकांच्या निवासासाठी असलेली ठिकाणे, चंद्रभागा नदी परिसर, महाद्वार परिसर अशा ठिकाणी काही खाजगी व्यक्ती दर्शनासाठी पैसे घेऊन भाविकांना दर्शन घडवून आणत असल्याची चर्चा आता मंदिर परिसरातील रहिवासी, नागरिक, व्यापारी व भाविक यांच्या मधून होताना दिसून येत आहे. परंतु या सर्व ठिकाणी मंदिर समिती पोलीस प्रशासनामार्फत सापळा लावून कारवाई करणार का? असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे.