दि. १९ ऑगस्ट रोजी मुंबई येथे गौरव
पंढरपूर (प्रतिनिधी) - अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई यांच्या तर्फे महाराष्ट्रातील संगीत क्षेत्रात अमूल्य योगदानाबद्दल दिला जाणारा प्रतिष्ठित "पं. विष्णु दिगंबर पलुस्कर संगीत कला गौरव पुरस्कार" सोलापूर जिल्ह्याचे संगीत रत्न प्रसिद्ध तबला वादक व ज्येष्ठ गुरु पं. प्रमोद पाटील यांना जाहीर झाला आहे.
पाटील हे अतिशय खडतर व प्रतिकूल परिस्थितीतुन ग्रामीण तसेच शहरी भागातील संगीतातील शेकडो मुलांना गेली ४० वर्षापासुन अविरतपणे विद्यादानाचे काम करत आहेत. त्यांचे शेकडो विद्यार्थी संगीत विशारद, संगीत अलंकार झाले आहेत. त्यांचे अनेक विद्यार्थी त्यांच्या कलेचा वारसा आज भारतात व जगभर चालवत आहेत, संगीत क्षेत्रात आज ठसा उमटवत आहेत व प्रचार प्रसार करत आहेत. कलापिनी संगीत विद्यालायातर्फे कलापिनी संगीत महोत्सवाच्या माध्यमातून पुणे, सोलापूर, पंढरपूर व गोवा येथे अनेक युवा व दिग्गज कलाकरांना त्यांनी व्यासपीठ मिळवुन दिले आहे. या त्यांच्या अमुल्य योगदानाची दखल घेउन गांधर्व महाविद्यालया तर्फे दिनांक १९ ऑगस्ट रोजी त्यांना वाशी, मुंबई येथे गौरवण्यात येणार आहे.