पंढरपूर दि18 - (उमाका) :- शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी शासन आपल्या दारी हा महत्वकांक्षी कार्यक्रम शासनामार्फत राबविण्यात येत आहे. शासन आपल्या दारी अभियानातर्गंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित 26 ऑगस्ट रोजी पंढरपूर तालुक्यात जिल्हास्तरीय कार्यक्रम नियोजित असून, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासनान अतिशय सुक्ष्म पातळीवर नियोजन करीत असल्याचे प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले.
शासन आपल्या दारी उपक्रमाबाबत पुर्व नियोजन आढावा बैठक प्रांताधिकारी कार्यालय पंढरपूर येथे घेण्यात आली. बैठकीस मोहोळचे प्रांताधिकारी अजिंक्य घोडगे, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, अपर तहसिलदार तुषार शिंदे, मुख्याधिकारी अविंद माळी, कार्यकारी अभियंता श्री. निंबकर, नायब तहसिलदार मनोज श्रोत्री तसेच संबधित विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.
यावेळी प्रांताधिकारी गुरव म्हणाले, जिल्ह्यातील सर्व विभागांच्या शासकीय योजना गतिमान करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यात शासन आपल्या दारी हे अभियान राबविण्यात येत आहे. ‘शासन आपल्या दारी’ जिल्हास्तरीय कार्यक्रमात जिल्ह्यातील 40 हजांराहून अधिक लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यात येणार आहे.कार्यक्रमासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांची वाहतूक व्यवस्था, भोजन व्यवस्था, कार्यक्रमस्थळी स्वच्छता, जलरोधक मंडप उभारणी, बैठक व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, वाहनतळ, आरोग्य पथक आदीच्या व्यवस्थेची जबाबदारी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांवर सोपविण्यात येणार आहे. पंढरपूर तालुक्यातील सर्व शासकीय विभागांनी आपल्या विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध योजनांची अचूक माहितीसह लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात येत आहे.
‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमांतर्गत लाभार्थ्यांना थेट लाभ उपलब्ध करून द्यावयाचा असल्याने सर्व विभागाने त्या दृष्टीने परिपूर्ण नियोजन करून कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच या कार्यक्रमासाठी वयोवृध्द नागरिक, दिव्यांग नागरिक, लहान मुले, गर्भवती महिला यांना आणू नये असे आवाहनही प्रांताधिकारी गुरव यांनी यावेळी केले.