शासन आपल्या दारी हा उपक्रम पंढरपूर येथे 26 ऑगस्ट रोजी घेण्याचे नियोजित
या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून सुमारे 40 हजार नागरिक विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी येणार
पंढरपूर (दि.05): विविध शासकीय योजनांचा जनतेला थेट लाभ देण्यासाठी शासन आपल्या दारी हा लोकाभिमुख उपक्रम राज्यात राबविण्यात येत आहे. शासन आपल्या दारी अभियानातर्गंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित 26 ऑगस्ट रोजी पंढरपूर येथे जिल्हास्तरीय कार्यक्रम नियोजित असून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक विभागाने समन्वयाने सुक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या.
शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे शासन आपल्या दारी उपक्रमाचा आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, प्रांताधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, अधिक्षक अभियंता संजय माळी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधन शेळकंदे, एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक विनोदकुमार भालेराव, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, नगरपालिका प्रशासन अधिकारी अशिष लोकरे, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी अरविंद माळी, कार्यकारी अभियंता श्री निंबकर, मंदीर समिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाढ यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, राज्यातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या तालुकानिहाय महसूल, कृषी, कामगार, पंचायत समिती, आरोग्य विभाग आदी विभागांच्या लाभार्थ्यांची योजनेच्या नावासह माहिती तयार करावी. अधिकाधिक लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ देण्याबाबत नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
या कार्यक्रमास सुमारे 40 हजारापेक्षा अधिक नागरिक उपस्थित राहणार असल्याने एकाही लाभार्थ्याची गैरसोय होणार नाही या अनुषंगाने आवश्यक नियोजन करावे असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगून वाहतुक व्यवस्था, स्वच्छ पिण्याचे पाणी, वाहनतळ, आरोग्य सुविधा, लाभार्थ्यांची बैठक व्यवस्था, लाभार्थ्यांना लाभाचे मान्यवरांच्या हस्ते वाटपाचे काटेकोर नियोजन करण्याचे त्यांनी सुचित केले. सर्व विभागांनी आपल्यावर सोपविलेली कामाची जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी अशा सूचनाही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी उपक्रमाची व प्रत्येक विभागाने करावयाच्या कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली.तत्पुर्वी जिल्हाधिकारी कुमार यांनी शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या अनुषंगाने 65 एकर, भीमा बसस्थानक तसेच चंद्रभागा बसस्थानक येथील जागेची पाहणी करुन संबधीत अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.