'विठ्ठल'च्या माजी संचालकाचा आमरण उपोषणाचा इशारा
पंढरपूर (प्रतिनिधी) - तालुकयातील भाळवणी येथील गणेश दत्तात्रय ताड या तरुणास डॉ. विजय गवळी यांच्या गुरांच्या शेडवर नेवून डॉ.विजय गवळी, संभाजी शिंदे, तेजस गवळी, अर्जुन गवळी, शुभम गायकवाड यांनी कोयत्याने तसेच काठी व केबलने बेदम मारहाण केल्याची फिर्याद पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. सदर प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ.विजय गवळी, संभाजी शिंदे, पोलीस पाटील अर्जुन गवळी याना पोलिसांनी अजूनही अटक केली नाही. सदर घटनेतील आरोपी विरोधात कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल व्हावा व सदर आरोपीना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी आपण दिनांक १ सप्टेंबर पासून पंढरपूर तहसील कार्यालयासमोर कुटूंबासह आमरण उपोषण सुरु करणार असल्याचा इशारा आज विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक व सदर फिर्यादी गणेश ताड याचे आजोबा नामदेव ताड यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना नामदेव ताड म्हणाले की, संभाजी शिंदे यांची गावात मोठी दहशत असून त्यांच्या दहशतीमुळेच काहींनी भाळवणी बंद मध्ये सहभाग घेतला मात्र गावातील दारूच्या धंद्यास विरोध केल्याचा राग मनात धरून मारहाण केल्याचा आरोप ताड यांनी केला आहे. संभाजी शिंदे हे ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष असल्याने राजकीय दबाव आणून केस मिटविण्याच्या हालचाली सुरु आहेत मात्र आम्ही या विरोधात कुटूंबासह आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे.