स्वेरीच्या रौप्य महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ थाटात संपन्न
पंढरपूर (प्रतिनिधी) - ‘ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण मिळावे या उदात्त हेतूने अत्यंत हालअपेष्टा सहन करत आणि स्वतःला चंदनाप्रमाणे झिजवून अनेक अडचणींतून मार्ग काढत डॉ. बी.पी. रोंगे सरांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांसाठी तंत्रशिक्षणाचे द्वार खुले केले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल करिअरच्या दृष्टीने संस्थेच्या स्थापनेपासूनच अनेक नवनवीन उपक्रम राबवले जात आहेत. त्यामुळे स्वेरीला विविध पातळ्यांवर अभूतपूर्व यश मिळत आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सर्वोत्तम पद्धतीने तंत्रशिक्षणाचा प्रसार करत असलेले "स्वेरी" हे बहुधा एकमेव शिक्षणसंकुल असावे. मी देखील विद्यार्थी चळवळीतून पुढे आलो. विद्यार्थ्यांची पॉवर दाखवत आणि ‘वंदे मातरम’ चा नारा देत शिक्षण घेतले. आज अभियंता असूनही राजकारणात एक सकारात्मक विचार घेऊन व समाजासाठी काहीतरी करावे या हेतूने डॉ. रोंगे सरांची आणि त्यांच्या टीमची प्रेरणा घेत त्यांचे अनुकरण करत आहे. स्वेरीचे विद्यार्थी आज प्रचंड प्रमाणात यशस्वी होत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घडवून त्यांचे करिअर बनवण्याचे अत्यंत अवघड कार्य डॉ. रोंगे सरांनी हाती घेतले आहे, हे खरोखर कौतुकास्पद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाला अधिक वेळ न देता स्वतःला घडविण्यासाठी जास्तीत जास्त वेळ द्यावा. आपल्या आई-वडिलांचे ऋण फेडण्यासोबतच आपल्याला देश घडवायचा आहे हे आपण लक्षात ठेवावे.’ असे प्रतिपादन माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते यांनी केले.
स्वेरी संचालित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते हे मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ, सोलापूरचे प्रभारी कुलगुरू डॉ. रजनीश कामत हे होते. दीप प्रज्वलनानंतर स्वेरी गीताच्या ध्वनीमुद्रिकेचे अनावरण करण्यात आले. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी. पी. रोंगे यांनी प्रास्ताविकातून सर्वांचे स्वागत करून स्वेरीच्या रौप्य महोत्सवी वाटचालीवर प्रकाश टाकला. १९९८ साली पत्र्याच्या शेड पासून सुरु झालेला हा प्रवास मोठमोठ्या इमारतींपर्यंत कसा पोहचला? या दरम्यान आलेल्या अडचणी आणि त्यावर केलेली मात यावर त्यांनी प्रकाश टाकला. पुढे डॉ. बी.पी.रोंगे म्हणाले की, ‘स्वेरीच्या या पंचेवीस वर्षांच्या काळात अनेक ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे सहकार्य लाभले. त्या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी मी त्यांच्या ऋणात राहणे पसंत करतो. या स्वेरीच्या रौप्य महोत्सवी वाटचालीत माझे गुरु विठ्ठल भगवान कुलकर्णी तथा आप्पा सर यांच्यापासून, पंढरपूर तालुक्याचे आमदार कै.सुधाकरपंत परिचारक, तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दत्तात्रय राणे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील, माजी कुलगुरू धनागरे, आमदार दिलीप वळसे-पाटील, कै. पी. बी. पाटील, हभप तनपुरे महाराज, भारताचे शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ.अनिल काकोडकर, बाटूचे माजी कुलगुरू डॉ.अशोक घाटोळ, सोलापूरच्या वालचंदचे प्राचार्य कै.डॉ.मदनाईक यांच्यासह, अर्बन बँकेचे अधिकारी भिंगे, गोपाळपूरचे सर्व सरपंच व ग्रामस्थ, स्वेरीचे सर्व देणगीदार, कुटुंबीय, नातेवाईक, मित्र परिवार तसेच अनेक ज्ञात व अज्ञात व्यक्तींनी स्वेरीला घडवण्यात मोलाचे योगदान दिले.'
शिक्षण संचालनालयाचे माजी अध्यक्ष डॉ.एन. बी. पासलकर म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांचा विकास हाच ध्यास’ या धर्तीवर स्वेरीचे कार्य अविरतपणे सुरू आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.’ अध्यक्षीय भाषणात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरचे प्रभारी कुलगुरू डॉ.रजनीश कामत म्हणाले की, ‘स्वेरीच्या संशोधनातील प्रगतीमुळे सर्वात प्रथम माझ्या कानावर स्वेरीचे नाव आले असून त्यावेळी स्वेरीमध्ये संशोधन क्षेत्रात ‘नॅशनल नॉलेज नेटवर्क’ चे मोठे प्रोजेक्ट यशस्वी झाले होते. स्वेरी हे महत्त्वाच्या संशोधनाच्या संबंधी प्रबंध व प्रोजेक्ट सादर करणारे सोलापूर विद्यापीठामधील महाविद्यालय असल्याचा मला सार्थ अभिमान वाटतो. या ठिकाणी ग्रामीण आणि शहरी असा भेदभाव न राहता स्वेरीने तंत्रशिक्षणाचा विकास आणि त्याचा दर्जा सिद्ध केलेला आहे. पंचवीस वर्षाचा इतिहास उलगडताना स्वेरी सातत्याने करत असलेल्या परिश्रमाचे सार्थक झाले आहे. सर्वांचा विकास करत असताना ‘व्हॅल्यू एज्युकेशन’ हे देखील महत्त्वाचे आहे. स्वेरीच्या अनेक उपक्रमांमुळे महाराष्ट्रामध्ये स्वेरी इंजिनिअरिंग महाविद्यालयाकडे ‘आदर्श महाविद्यालय’ म्हणून पाहिले जाते. या महाविद्यालयात विद्यार्थी केंद्रित गोष्टी असतात म्हणून स्वेरीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्लेसमेंटच्या माध्यमातून स्वेरीतून घडविले जाते. हे अवघड कार्य असून अनेकांना जमले नाही ते स्वेरीने ग्रामीण भागात यशस्वीपणे करून दाखवले याचाही सार्थ अभिमान वाटतो.’ असे सांगून त्यांनी स्वेरीच्या कामगिरीचे भरभरून कौतुक केले. यावेळी स्वेरीवर गीत लिहिल्याबद्दल गीतकार प्रा.संतोष मडकी, संगीतकार राजु पुरंदरे, गायक योगेश गायकवाड आणि गायिका अनारकली काराळे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी स्वेरीच्या प्रा. नीता कुलकर्णी यांनी स्वेरीवर स्वरचित कविताही सादर केली. या प्रसंगी स्वेरीचे उपाध्यक्ष हनिफ शेख, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त नामदेवराव कागदे, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त प्रा. सी.बी. नाडगौडा, विश्वस्त अशोक भोसले, विश्वस्त एच. एम. बागल, विश्वस्त बी.डी.रोंगे, विश्वस्त एस.टी. राऊत, युवा विश्वस्त प्रा. सूरज रोंगे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन सौ.प्रेमलता रोंगे, डॉ.श्रीदेवी, स्त्रीरोग तज्ञ डॉ.स्नेहा रोंगे, प्रसिद्ध भारुडकार चंदाताई तिवाडी, आर्किटेक्ट यादगिरी कोंडा, स्ट्रक्चरलचे प्रमोद जोशी, बाटुचे माजी कुलगुरू डॉ. अशोक घाटोळ, स्वेरीच्या गव्हर्निंग बॉडीचे डॉ.विजय कुलकर्णी, शास्त्रज्ञ व्ही. के. सूरी, वालचंद सांगलीच्या प्लेसमेंट विभागाचे संजय धायगुडे, माजी विद्यार्थी संघटनेचे दत्ता घोडके, डॉ.विश्वासराव मोरे, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार, स्वेरी परिवारातील सदस्य, विद्यार्थी, पालक, पंढरपूर पंचक्रोशीतील नागरिक, पत्रकार, वकील मित्र, हितचिंतक, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ.यशपाल खेडकर यांनी केले तर संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. स्वेरीच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाच्या निमित्ताने सायंकाळी ‘स्वरानुभूती’ या सांस्कृतिक कार्यक्रमातून पार्श्वगायिका कार्तिकी गायकवाड, कौस्तुभ गायकवाड व कल्याणजी गायकवाड यांच्या भक्ती गीत, भावगीत, मिमिक्रीच्या माध्यमातून सर्वांना मंत्रमुग्ध केले. एकंदरीतच स्वेरीचा रौप्य महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ अतिशय उत्साहात पार पडला.