पंढरपूर (प्रतिनिधी) - म्हैसूर ते सोलापूर ही गोलघुमट एक्स्प्रेस रेल्वे गाडी आता पंढरपूर पर्यंत विस्तारित करण्यात आली आहे.
येत्या ४ सप्टेंबर पासून ही रेल्वे सुरू होत आहे. दररोज पंढरपूर ते म्हैसूर अशी रेल्वे धावणार आहे. त्यामुळे दक्षिण भारतातील प्रवाशांना पंढरपूरला येण्यासाठी आणि पंढरपूरच्या प्रवाशांना दक्षिण भारतात जाण्यासाठी एक चांगली रेल्वे गाडी उपलब्ध झाली आहे.
शुक्रवारी रेल्वेने नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार म्हैसूर ( गाडी नंबर १६५३५ ) येथून पंढरपूर साठी दररोज दुपारी ३,४५ वाजता ही रेल्वे निघणार असून पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी साडे बारा वाजता पोहोचणार आहे. त्यानंतर लगेचच दुपारी एक वाजता ही रेल्वे म्हैसूर (गाडी नंबर १६५३६ ) साठी परत निघणार असून दुसऱ्या दिवशी म्हैसूर येथे ही रेल्वे दुपारी २ वाजून १० मिनिटांनी पोहोचणार आहे, अशी माहिती दक्षिण - पश्चिम रेल्वेच्या प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. दरम्यान १ ऑक्टोबर पासून या वेळापत्रकात बदल केला जाण्याचीही शक्यता रेल्वेकडून व्यक्त करण्यात आली आहे. या विस्तारित रेल्वेचा लाभ दक्षिणेतून पंढरपूर ला येणाऱ्या आणि पंढरपूरहून दक्षिणेत जाणाऱ्या प्रवाशांना होणार आहे. मागील पंधरा दिवसापूर्वी म्हैसूर ते सोलापूर रेल्वेचा पंढरपूरपर्यंत विस्तार करण्यात आला होता.