करकंब येथील 23 शेतकऱ्यांचा सातबारा कोरा
पंढरपूर (दि.02):- महसूल विभागाच्या वतीने 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट महसूल सप्ताह साजरा होत आहे. या अनुषंगाने तालुक्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. करकंब (ता.पंढरपूर) येथील भुविकास बँकेच्या २३ खातेधारक शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावरील कर्ज बोजाच्या नोंदी कमी केल्या. सदर कर्ज बोजे कमी झाल्याबाबतचे फेरफार व सातबारा उतारे यांचे वाटप प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते करण्यात आले.
महसूल सप्ताह निमित्त करकंब (ता.पंढरपूर) येथील रामभाऊ जोशी हायस्कुल येथे युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले वाटप व भूविकास बँकेचे कर्ज बोजे कमी केलेल्या साताबारा उताऱ्याचे वाटप करण्यात आले. यावेळी अपर तहसीलदार तुषार शिंदे, नायब तहसीलदार सायली जाधव- नाईक, मंडळ अधिकारी चंद्रकांत ढवळे, तलाठी दादा पाटोळे, निलेश कुंभार, कोतवाल कुंडलिक शिंदे, गुलाब कोरबू, प्राचार्य हेमंत कदम, माजी जिल्हापरिषद सदस्य बाळासाहेब देशमुख, उपसरपंच आदिनाथ देशमुख, माजी पंचायत सदस्य राहुल पुरवत आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले जावे त्यांची आर्थिक भरभराट व्हावी यासाठी शेतीच्या विकासाकरता भुविकास बँक दीर्घकालीन कर्ज अदा करत होती. या कर्जाच्या नोंदी संबंधित शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर घेण्यात आल्या होत्या. शेत जमिनीच्या उतारावरील भुविकास बँकेच्या बोजामुळे कर्ज काढणे, गहाण ठेवणे, हस्तांतरण करणे, खातेफोड करणे व शेती विक्री कामात अडचणी येत होत्या. मात्र शासनाच्या 09 नोव्हेंबर 2022 च्या शासन निर्णयानुसार भूविकास बँका बाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात आला व या बँकांच्या कर्जदारांकडे संपूर्ण कर्ज रक्कम माफ करण्यात आली. भुविकास बँकेच्या करकंब (ता. पंढरपूर) येथील २३ खातेधारक शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावरील कर्ज बोजाच्या नोंदी कमी करण्यात आल्या. यावेळी सातबारा कर्ज बोजेमुक्त झाल्यामुळे शेतकऱ्यांनी प्रशासना प्रति समाधानाचे भाव व्यक्त केले .
लाभार्थी यांनी मानले शासनाचे आभार…
करकंब (ता.पंढरपूर) येथील लाभार्थी शेतकरी दिलीप रामचंद्र व्यवहारे आभार व्यक्त करताना म्हणाले, गेली 30 वर्ष भूविकास बँकेचे कर्ज होते ते मला आजपर्यंतफेडता आले नाही. सातबारा उताऱ्यावर भुविकास बँकेचा बोजा दिसत असल्यामुळे नवीन कर्ज ही मिळत नव्हते तसेच खाते वाटपही करता येत नव्हते. पण शासनाने ही कर्ज माफी केली आणि या महसूल सप्ताह मधून मला कोरा 7/12 उतारा मिळाला, आता आम्हाला इतर लाभ मिळणेचा मार्ग मोकळा झाला