कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त तालुक्यात 9 दिवस मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर- प्रणव परिचारक
पंढरपूर (प्रतिनिधी):- कर्मयोगी श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त पंढरपूर तालुक्यातील आठही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्येच रक्तदाब व मधुमेह तपासणी देखील होणार आहे. तसेच प्रधानमंत्री आयुष्यमान आरोग्य कार्ड व आधारकार्ड दुरूस्ती अभियान संपन्न होणार आहे. दि.27 ऑगस्ट रविवार भाळवणी पासून या शिबिराची सुरुवात होईल. पुढील नऊ दिवस हे शिबिर सुरू असल्याची माहिती भाजपा युवा नेते प्रणव परिचारक यांनी दिली.
पांडुरंग परिवार युवक आघाडी व प्रणव परिचारक युवा मंच यांच्या वतीने मा.आ.प्रशांतरावजी परिचारक व मा.उमेशराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त या शिबिराचा शुभारंभ करण्यात येणार आहे. तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आणि ग्रामीण रूग्णालय करकंब येथे हे शिबिर होणार आहे. यासाठी एच व्ही देसाई हॉस्पिटल हडपसर यांचे देखील सहकार्य लाभत आहे. या शिबिरामध्ये रुग्णांची नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया-लेन्ससहीत व मोफत चष्म्यासह सुविधा दिल्या जाणार आहेत.
यामध्ये रविवार 27 ऑगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र भाळवणी, सोमवार 28 ऑगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र तुंगत, मंगळवार 29 ऑगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र रोपळे , बुधवार 30 ऑगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र गादेगाव, गुरुवार 31 ऑगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र खर्डी, शुक्रवार 01 सप्टेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र कासेगाव, शनिवार 02 सप्टेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र पुळुज, रविवार 03 सप्टेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र उंबरे-पागे, सोमवार 04 सप्टेंबर रोजी ग्रामीण रूग्णालय करकंब, याठिकाणी सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत होणार आहे.
पंढरपूर तालुक्यातील अनेक रुग्णांमध्ये डोळ्याच्या समस्या उद्भवतात, अश्या रुग्णांसाठी हे शिबिर आधारभूत ठरत आहे. कर्मयोगी स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांचा सेवेच्या विचाराचा वारसा पांडुरंग परिवाराच्या माध्यमातून अशा प्रकारच्या "नेत्र तपासणी" व "मोतीबिंदू शस्त्रक्रिया" शिबिरातून अविरतपणे सुरू असल्याचा विश्वासही यावेळी प्रणव परिचारक यांनी व्यक्त केला.