पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांना शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याकरीता पुरवठा करणारा तिसंगी-सोनके तलाव पुर्ण क्षमतेने भरुन मिळावा अशी लेखी मागणी मुंबई येथे समक्षभेट घेवून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी केली आहे.
पंढरपूर तालुक्यातील तिसंगी-सोनके या तलावातून मौजे खेडभाळवणी, कौठाळी, शेळवे, भंडीशेगांव, वाखरी, उपरी, गादेगांव, पळशी, सुपली व सोनके इ. गावांना पिण्यासाठी व शेतीच्या सिंचनासाठी पाणी पुरवठा होत आहे. सध्या पंढरपूर तालुक्यात पाऊसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके पाण्याअभावी जळू व करपू लागलेली असून पिण्याचा पाण्याचा प्रश्नही गंभीर गंभीर बनला आहे. तलावात येणाऱ्या निरा भाटघर धरण पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस झालेला असल्याने सदरच्या धरणातून तिसंगी-सोनके तलावात पाणी सोडल्यास वर नमुद केलेल्या गावांचा पिण्याचा पाण्याचा व शेतीच्या पाण्याचाही प्रश्न सुटणार आहे. तिसंगी सोनके तलाव पुर्ण क्षमतेने भरुन मिळावा असे निवेदनात म्हटले आहे तसेच उजनीच्या डाव्या व उजव्या कालव्यास व भिमानदीस पाणी सोडावे अशीही मागणी यावेळी करण्यात आली.