करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी ‘हार्ड वर्क’ करणे अत्यंत आवश्यक - प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे

0
स्वेरीत प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी स्वागत समारंभ संपन्न

      पंढरपूर (प्रतिनिधी) - 'अभियांत्रिकीमधून करिअर करताना कोणती ब्रँच मिळाली हे महत्वाचे नाही. त्यापेक्षा मिळालेली ब्रँच ही जगातील सर्वात चांगली ब्रँच आहे असे समजून त्या ब्रँचला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. मिळालेल्या ब्रँच मध्ये लीडर बनून त्या ब्रँचचे महत्व अनन्य साधारण असल्याचे सिद्ध करता आले पाहिजे कारण करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी ‘हार्ड वर्क’ करण्याची गरज आहे. ‘हार्ड वर्क’ केल्यामुळे यशस्वी होण्याचे प्रमाण वाढते.’ असे प्रतिपादन स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी केले.
           गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट मधील अभियांत्रिकी, फार्मसी, एमबीए, एमसीए व पदविका या अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षात तसेच थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंग व फार्मसीला प्रवेश घेतलेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे हे मार्गदर्शन करत होते. प्रारंभी सर्व विद्यार्थी व पालकांचे गुलाब पुष्प देवून स्वागत करण्यात आले. व्यासपीठावर पालक प्रतिनिधी म्हणुन फुलचंद पुजारी व महिला पालक प्रतिनिधी म्हणून सौ.वैशाली दानवे हे उपस्थित होते. सांस्कृतिक विभाग व संवाद प्रमुख डॉ.यशपाल खेडकर यांनी प्रास्ताविकात 'खर्डी सारख्या ग्रामीण भागापासून सुरुवात केलेल्या डॉ. बी. पी. रोंगे सर यांनी विद्यार्थ्यांसाठी १९९८ पासून तंत्रशिक्षणाचे एक आदर्श  दालन खुले केले आणि त्या शिक्षण संकुलाच्या माध्यमातून शिक्षण घेतलेले ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी आज मोठ्या पॅकेजसह देशात आणि परदेशात स्थायिक झालेले असून ते उत्तम करिअर करत आहेत. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात ‘स्वेरी’चा आज राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक आहे,' असे सांगितले. पुढे बोलताना सचिव व प्राचार्य डॉ.रोंगे म्हणाले की, ‘नापास होणे, सेकंड क्लास मिळविणे ही बाब स्वेरीत अत्यंत अवघड आहे तर  गुणवत्ता यादीत येणे, फर्स्ट क्लासमध्ये पास होणे या बाबी मात्र स्वेरीत खूप सोप्या आहेत. पालक व विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या माध्यमातून स्वेरीवर टाकलेला विश्वास मुळीच वाया जाणार नाही. विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी आमचा संपूर्ण स्टाफ सज्ज आहे.  स्वेरीतून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आज अमेरिका, जपान अशा विविध देशात जावून यशस्वी जीवन जगत आहेत.’ असे सांगून टीव्ही, मोबाईल व तथाकथित मित्र या तीन गोष्टींपासून दूर राहण्याचा कानमंत्रही प्राचार्य डॉ. रोंगे यांनी दिला. पालक प्रतिनिधी म्हणून बोलताना फुलचंद पुजारी म्हणाले की, ‘स्वेरीतून मिळणारे संस्कार, आदरयुक्त शिस्त आणि शिक्षण यामुळे विद्यार्थ्यांची झेप प्रगतीकडे होत आहे. स्वेरीत आलेल्या आदरयुक्त शिस्त व  संस्काराच्या अनुभवामुळे  माझ्या पाल्याचा स्वेरीत प्रवेश निश्चित केल्याचा  अभिमान वाटतो आणि आपल्या पाल्यांचा बौद्धिक विकास हा स्वेरीच्या संस्कारित सानिध्यातून होणार आहे, हे मात्र निश्चित.’ असे सांगून त्यांनी  स्वेरीच्या मागील २५ वर्षांच्या शैक्षणिक कार्याचा विशेष गौरव केला. यावेळी पालक वासुदेव घाडगे, शिरीश लामगुंडे, संजय सोपल, सत्तार सय्यद यांच्यासह कांही पालकांनी प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांचा सत्कार केला. याप्रसंगी स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार,  डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा.सतिश मांडवे, प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता प्रा. करण पाटील, प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ.सतिश लेंडवे, सर्व  अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी व विविध भागातून आलेले त्यांचे पालक असे मिळून सुमारे चार हजार विद्यार्थी व पालक या कार्यक्रमास उपस्थित होते. सांस्कृतिक विभाग व संवाद प्रमुख डॉ. यशपाल खेडकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)