शेतकऱ्यांच्या अधिकारांबाबत आयोजित पहिल्या जागतिक परिषदेचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :-शेतकऱ्यांच्या अधिकारांबाबत नवी दिल्ली येथे आयोजित पहिल्या जागतिक परिषदेचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (12 सप्टेंबर 2023) केले. जगातील शेतकरी बांधव हेच मोठे संवर्धक असून तेच पीक विविधतेचे खरे संरक्षक आहेत, असे राष्ट्रपतींनी यावेळी सांगितले.
शेतकऱ्यांना अनन्यसाधारण शक्तीचे वरदान असून त्यांच्यावर जबाबदारी आहे. ज्यांचे अस्तित्व आपल्या सर्वांसाठी महत्त्वपूर्ण आहे अशा वनस्पती आणि प्रजातींच्या अनेक जातींचे संरक्षण आणि पुनरुज्जीवन करण्याच्या शेतकऱ्यांच्या प्रयत्नांचे आपण सर्वांनी कौतुक केले पाहिजे, यावर राष्ट्रपतींनी भर दिला.
रोमस्थित अन्न आणि कृषी संघटनेच्या, अन्न आणि कृषीसंदर्भात वनस्पती अनुवांशिक संसाधने आंतरराष्ट्रीय कराराच्या सचिवालयाने या परिसंवादाचे आयोजन केले असून परिसंवादाचे यजमानपद, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने वनस्पती जाती आणि शेतकरी हक्क प्राधिकरण, भारतीय कृषी संशोधन परिषद, आयसीएआर -भारतीय कृषी संशोधन संस्था आणि आयसीएआर - राष्ट्रीय वनस्पती अनुवांशिक संसाधने ब्यूरो यांच्या संयुक्त विद्यमाने भूषवले आहे.
भारत हा जगाच्या एकूण भूक्षेत्रापैकी केवळ 2.4 टक्के भूभाग असलेला बहुविविधता असलेला देश आहे, परंतु सर्व नोंदी केलेल्या वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींमध्ये त्याचा 7-8 टक्के वाटा आहे, असे राष्ट्रपतींनी सांगितले. जैवविविधतेच्या बाबतीत, वनस्पती आणि प्रजातींच्या विस्तृत श्रेणीने संपन्न देशांपैकी भारत असल्याचे त्या म्हणाल्या. भारतातील ही समृद्ध कृषी-जैवविविधता जागतिक समुदायासाठी एक खजिना आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
कृषी संशोधन आणि तंत्रज्ञान विकासामुळे भारताला अन्नधान्य, फलोत्पादन, मत्स्यपालन, दूध आणि अंडी यांचे उत्पादन 1950-51 पासून अनेक पटीने वाढवता आले आहे. त्याचा लक्षणीय परिणाम राष्ट्रीय अन्न आणि पोषण सुरक्षेवर झाल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले. कृषी-जैवविविधता संवर्धक आणि औद्योगिक शेतकरी, शास्त्रज्ञ आणि धोरणकर्ते यांचे प्रयत्न आणि सरकारी पाठबळ यांनी देशातील अनेक कृषी क्रांतींना चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तंत्रज्ञान आणि विज्ञान हे वारसा ज्ञानाचे प्रभावी संरक्षक आणि संवर्धक म्हणून योगदान देऊ शकतात, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला.
यावेळी 2020-21 आणि 2021-22 या वर्षासाठीचे वनस्पती अनुवांशिकी संवर्धन पुरस्कार प्रदान करण्यात आले.यात वनस्पती अनुवांशिकी संवर्धन समुदाय पुरस्कार आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव इथल्या याहा मोगी माता स्थानिक बियाणे संवर्धन समितीला प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि 10 लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
धडगाव तालुक्यातल्या 10 गावांमध्ये ही समिती कार्यरत असून हरणखुरी आणि चोंदवडे या दोन गावांमध्ये समितीने बीज बँका स्थापन केल्या आहेत. समितीशी संलग्न स्थानिक शेतकरी मका, ज्वारी, विविध भरडधान्य, कडधान्य, स्थानिक भाज्या, अशा 108 स्थानिक पीक वाणांचे संवर्धन करत आहेत.