गणेशोत्सव सामाजिक उपक्रम राबवून पर्यावरणपूरक पध्दतीने साजरा करा - जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांचे आवाहन

0
             पंढरपूर दि. 15 (प्रतिनिधी) :-  पंढरपूर शहर व तालुक्यात सर्वच समाजाचे सण, उत्सव  एकत्र येऊन आनंदाने साजरे करतात व  जातीय सलोखा अबाधित ठेवतात. हीच परंपरा  कायम ठेवून, गणेशोत्सव तसेच अन्य आगामी सण उत्सव साजरे करावेत.आगामी गणेशोत्सव करताना  गणेशोत्सव मंडळांनी  सामाजिक उपक्रम राबवून पर्यावरणपूरक पध्दतीने साजरा करावा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केले आहे.
           श्री गणेशोत्सव व ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर रखुमाई सभागृह, पोलीस संकुल पंढरपूर येथे शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, प्रांताधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, मुख्याधिकारी अरविंद माळी, वीज वितरणरचे उप कार्यकारी अभियंता श्री.भोळे, उप  विभागीय अभियंता भीमाशंकर मेटकरी, पोलीस निरिक्षक अरुण फुगे, मिलींद पाटील , गणेशत्सोव मंडळाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस पाटील यांच्या सह पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.
    यावेळी पोलीस अधीक्षक सरदेशापांडे म्हणाले, गणेशोत्सवात पारंपरिक वाद्यांचा वापर करावा ध्वनिक्षेपकाच्या आवाजाची मर्यादा पाळावी. पोलीस प्रशासन सर्वांसाठी सज्ज आहे. लागणारी आवश्यक ती मदत पोलीस प्रशासनाकडून करण्यात येईल. पंढरपूर शहरातील नगरपालिका, महावितरण पोलीस प्रशासन यांनी शहरातील संयुक्त पाहणी करून आवश्यक ठिकाणी  तात्काळ सुविधा उपलब्ध कराव्यात. नागरिकांनी समाज माध्यमातून जातीय तेढ निर्माण होईल असे संदेश प्रसारित होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. शहरातील व ग्रामीण भागातील गणेशत्सोव मंडळांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करतील तसेच कायदा व सुव्यवस्थेचे पालन करतील अशा रचनात्मक काम करणाऱ्या मंडळांसाठी पोलीस प्रशासनाकडून बक्षीस योजना जाहीर केली आहे. तसेच या कालावधीत सामाजिक, जातीय सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नागरिकांचाही सन्मान करण्यात येणार येणार आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्यात सामाजिक आणि धार्मिक शांतता बिघडवणाऱ्या लोकांवर तसेच इतर गुन्हे करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव म्हणाले, गणेशोत्सव मंडळानी कागदपत्रांची पूर्तता करून आवश्यक ती परवानगी घ्यावी.गणेशोत्सवासाठी उभारण्यात येणारा मंडप  सार्वजनिक जागेत असेल तर त्या संबंधित यंत्रणेची परवानगी घ्यावी.मंडपामुळे रहदारीस अडथळा येणार नाही तसेच  संबंधित ठिकाणच्या नागरिकांना अत्यावश्यक  सुविधा पुरविण्यासाठी रस्ता मोकळा राहील याची दक्षता घ्यावी. विद्युत रोषणाईसाठी करण्यात आलेली वीज जोडणी सुरक्षित असावी. ग्रामीण भागातील गणेश उत्सव मंडळाने एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवावी.गणेश मंडळांनी सामाजिक उपक्रम राबवावेत तसेच समाज जागृतीचे देखावे सादर करावेत असे आवाहन त्यांनी यावेळे केले.

        पंढरपूर शहर व तालुक्यातील गणेशोत्सव मंडळानी संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा. पात्र प्रदूषित होणार नाही याची दक्षता घेवून प्रशासनाने ठरवून दिलेल्या जागेतच निर्माल्य टाकावे. तसेच सर्व गणेश उत्सव मंडळान सुरक्षेसाठी अग्निशमन यंत्रणा बसवावी असे आवहन प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी यावेळी केले. पंढरपूर शहर व तालुक्यात 424 गणेश मंडळे असून, आतापर्यंत 102 गणेशोत्सव मंडळांनी ऑनलाइन परवानगी घेतली आहे. ऑनलाइन परवानगी घेण्यासाठी आवश्यक कागदपत्राची पूर्तता करून तत्काळ परवानगी घ्यावी. तात्पुरती वीज जोडणी घेण्यासाठी वीज वितरण कंपनीकडे मागणी करावी, आवाजाची मर्यादा पाळावी ध्वनी प्रदूषण होणार नाही याची दक्षता घ्यावी. गणेशोत्सव शांतता व सौहार्दाच्या वातावरणात पार पाडावा व त्यासाठी सर्व मंडळांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री भोसले यांनी केले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)