सूर्याच्या अभ्यासासाठी भारताची पहिली मोहीम
दरदिवशी सूर्याची १,४०० छायाचित्रे टिपणार
श्रीहरिकोटा (वृत्तसंस्था) - भारताने सूर्याच्या अभ्यासासाठी आखलेल्या पहिल्या मोहिमेतील आदित्य- एल यानाचे आज २ सप्टेंबर रोजी दुपारी ११:५० वाजता श्रीहरिकोटा येथून अवकाशात प्रक्षेपण होणार आहे. इस्त्रोच्या चंद्रयान-३ मोहिमेच्या यशानंतर सूर्याच्या दिशेने आदित्य- एल च्या हनुमान उडीकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे .
आदित्य- एलची हनुमान उडी १५ लाख किमी पृथ्वीपासून दूर असेल. हे अंतर चंद्रापेक्षा चार पट अधिक असेल. आदित्यला एल-१ पर्यंत पोहोचण्यासाठी ४ महिने लागतील.
व्हीएलसी या उपकरणाची निर्मिती इस्रो व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्सची संलग्न संस्था सेंटर फॉर रिसर्च अँड एज्युकेशन इन सायन्स टेक्नॉलॉजी (क्रेस्ट) यांनी संयुक्तरीत्या केली आहे. आदित्य- एल १ यानावर सात उपकरणे असून त्यातील चार उपकरणे सूर्यप्रकाशाचा तर अन्य तीन उपकरणे सूर्याचा प्लाझ्मा व चुंबकीय क्षेत्राचा
अभ्यास करतील.
आदित्य-एल सुरुवातीला पृथ्वीभोवतीच्या नजीकच्या कक्षेत पाठवले जाईल. हळूहळू त्याची कक्षा रुंदावत ती लंबवर्तुळाकार केली जाईल.
नंतर ऑनबोर्ड प्रोपल्शनच्या मदतीने लॅगरेंज पॉइंट (एल१) च्या दिशेने मार्गस्थ होईल. एल च्या दिशेने जाताना पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षीय क्षेत्रातून बाहेर पडेल. क्रूझ फेजमार्गे ते एल१ भोवतीच्या हॅलो ऑबिटमध्ये प्रवेश करेल. या कक्षेत सूर्य आणि चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती संतुलित असून, कमीत कमी इंधनात अधिक कालावधीपर्यंत सूर्याचे निरीक्षण करता येईल.
चांद्रयान ३ च्या यशानंतर संपूर्ण जगाचे सूर्याच्या अभ्यासासाठी निघालेल्या आदित्य एल यानावर लक्ष लागले आहे.