कर्मवीरांच्या विचार आणि कार्याचे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्रतिबिंब– डॉ. राजनीश कामत

0
          पंढरपूर (प्रतिनिधी) - “पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील हे दूरदृष्टीचे शिक्षण तज्ज्ञ होते. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस त्यांनी बहुजन समाजातील उपेक्षित वंचित घटकांसाठी शिक्षणाची संधी उपलब्ध केली. ‘कमवा आणि शिका’ हे त्यांनी राबविलेले धोरण हे विद्यार्थ्यांमध्ये कौशल्ये विकसित करणारे आणि त्यांची समाजाप्रती असणारी बांधिलकी वाढविणारे होते. त्याग आणि समर्पण ही मानवी मूल्ये समाजाच्या विकासासाठी अत्यंत मोलाची असून ती विद्यार्थ्यामध्ये रुजविणे महत्त्वाचे आहे. सध्या केंद्र सरकार राबवीत असलेले नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अभ्यासल्यास त्यात कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विचार आणि कार्य यांचे प्रतिबिंब पडलेले दिसून येईल.” असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी केले.  
        रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालय व यशवंत विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे छत्तीसाव्या जयंती सप्ताह सांगता समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेच्या मनेजिंग कौन्सिल चे सदस्य एड. रवींद्र पवार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, ‘रयत’च्या जनरल बॉडीचे सदस्य अमरजीत पाटील, डॉ. दादासाहेब साळुंखे, डॉ. राजेंद्र जाधव, जगन्नाथ भायगुडे, सुभाषआबा सोनवणे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष वसंत नाना देशमुख, उपप्राचार्य डॉ. बजरंग शितोळे, उपप्राचार्य डॉ. भगवान नाईकनवरे, उपप्राचार्य राजेंद्र कवडे, अधिष्ठाता डॉ. बाळासाहेब बळवंत, अधिष्ठाता डॉ. अनिल चोपडे,  सांस्कृतिक विभागाचे चेअरमन डॉ. रमेश शिंदे,  मुख्याध्यापक सौ. अनिता साळवे व पर्यवेक्षक युवराज आवताडे आदी मान्यवर उपस्थित होते. 
          डॉ. राजनीश कामत पुढे म्हणाले की,  “शैक्षणिक क्षेत्रातील सध्याची दुरवस्था दूर करण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांची आवश्यकता आहे. एखादे स्वप्न उराशी बाळगून ते साकार करण्यासाठी अनंत यातना भोगाव्या लागून देखील आपल्या कार्यावरील निष्ठा यत्किंचित देखील ढळू न देणारे कर्मवीर भाऊराव पाटील हे शैक्षणिक क्षेत्रातील आदर्श ठरतात. कर्मवीरांच्या चरित्रातून नकारात्मकता पचविण्याची शक्ती मिळते. सगळ्यांचे कल्याण, विषमता दूर करणे, गरिबी दूर करणे या सर्व बाबी त्यांच्या चरित्रातून अभ्यासता येतात. म्हणून कर्मवीर हे नव्या काळातील प्रेरणास्त्रोत आहेत.” 
        अध्यक्षीय भाषणात एड. रवींद्र पवार म्हणाले की, “सध्या समाजात जात आणि धर्माचे प्राबल्य निर्माण होताना दिसते आहे. राजकीय व शैक्षणिक वातावरण जातग्रस्त आणि धर्मग्रस्त झाले आहे. देशातील जातीयता आणि धर्मांधता नष्ट करण्यासाठी अनेक समाजधुरिणांनी मोठ्या प्रमाणात संघर्ष उभा केला. ‘रयत’च्या निर्मितीतून उपेक्षित वंचित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य कर्मवीरांनी केले. शासकीय शाळा खाजगी कंपन्यांना देण्याचे शासनाचे धोरण पूर्णत: चुकीचे असून सामान्य माणसांना शिक्षणापासून वंचित रहावे लागते कि काय अशी परिस्थिती निर्माण होत आहे. तेंव्हा शासनाच्या अशा धोरणास सर्वांनी विरोध केला पाहिजे.” 
       कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अमर कांबळे, प्रा. डॉ. प्रशांत नलावडे व प्रा. सारिका भांगे यांनी केले. या कार्यक्रमात महाविद्यालयातील आणि यशवंत विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि शिक्षकांचा पारितोषिक देवून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे माजी सेवक, रयत प्रेमी, सिनिअर, ज्युनिअर, व्यवसाय अभ्यासक्रम विभागातील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि पालक बहुसंख्येने उपस्थित होते. शेवटी उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक सौ. अनिता साळवे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)