पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील माण नदीकाठच्या शेतकऱ्यांना टेंभू पाणी योजनेतील पाणी मिळवून देण्यासाठी मी राज्याचे उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करुन निश्चितपणे शासनदरबारी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी मंगळवेढा तालुक्यामध्ये सुरु असलेल्या गावभेट दौऱ्यादरम्यान दिली आहे.
मंगळवेढा तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनतेच्या अडी-अडचणी व समस्या जाणून घेण्यासाठी आ आवताडे गेल्या तीन दिवसांपासून तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये गावभेट दौरा करत आहेत. आ. आवताडे यांनी सोमवारी या दौऱ्यानिमित्त महमदाबाद(शे), लक्ष्मी दहिवडी, कचरेवाडी व डोंगरगाव या गावांना विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत भेटी देऊन ग्रामस्थ व नागरिकांशी संवाद साधला. मंगळवेढा तालुक्यातील पाणीप्रश्न हा केवळ राजकीय भांडवलाचा विषय न ठेवता याकडे संवेदनशील दृष्टीकोनातून पाहण्याची गरज असल्याचेही आ. आवताडे यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे.
टेंभू योजनेतून पंढरपूर तालुक्यातील तावशी, तनाळी, तरटगाव, सिद्धेवाडी, चिचुंबे, शेटफळ व मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी, महमदाबाद (शे), गुंजेगाव, घरनिकी, मारापूर, देगांव, शरदनगर या माण नदीकाठच्या गावांना पाणी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करुन पाणी देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही आ.आवताडे यांनी सांगितले आहे.
यावर्षी खरीप हंगामामध्ये अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थितीचे ढग निर्माण झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शेतकरी व नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी तसेच शेतीसाठी व पशुधन जगविण्यासाठी पाण्याअभावी खूप मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. वरील गावांना या योजनेतून पाणी मिळवून देण्याची तरतूद झाल्यास तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे. मतदारसंघातील विविध विकास कामांना भरघोस निधीच्या रूपाने चालना देणारे आ आवताडे यांनी या योजनेच्या पाण्यासाठी कंबर कसल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
त्याचबरोबर देश व राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या सक्षम आरोग्यासाठी आयुष्यमान भारत योजने अंतर्गत कोणत्याही आजारावर केंद्र व राज्य सरकार प्रत्येकी ५ असे मिळून एकूण १० लाखापर्यंत मोफत उपचार देण्याची महत्वकांक्षी योजना आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी तालुका आरोग्य विभाग यांच्याकडे संपर्क करुन लाभ घेण्याचेही आवाहन करण्यात आले.
मतदारसंघातील विविध गावांमध्ये शेतीसाठी अथवा घरगुती वापरासाठी लागणारी वीज ही आकडा टाकून घेतल्याने त्याचा अतिरिक्त दाब डी.पी. वर पडून नियमित वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी निर्माण होत असल्यामुळे नागरिकांनी रीतसर कोटेशन भरून आपली वीजजोडणी करुन घ्यावी जेणेकरून आवश्यक ठिकाणी नवीन डी. पी. निर्मितीसाठी सोयीस्कर होईल असेही आ आवताडे यांनी यावेळी नमूद केले आहे. रीतसर कोटेशन घेणाऱ्या शेतकरी व नागरिकांची वीज जोडणी करुन त्यांना लवकरात-लवकर कनेक्शन देण्याचेही आ आवताडे यांनी महावितरण विभागाला आदेशीत केले आहे.