स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी केले पालवीतील चिमुकल्यांना आपलेसे

0
स्वेरीने साजरे केले अनोखे रक्षाबंधन !

         पंढरपूर (प्रतिनिधी) - रक्षाबंधन, तसा भाऊ-बहिणीच्या अनोख्या नात्याचा दिवस !  सर्वत्र हा दिवस विविधतेने व उत्साहात साजरा केला जात असल्याचे आपण  पाहतो. या पवित्र सणाच्या निमित्ताने अनेक भाऊ हे आपल्या बहिणींसाठी महागड्या वस्तू , साडी आदी भेटवस्तू ओवाळणी म्हणून देत असतात. समाजोपयोगी उपक्रम सातत्याने साजरा करून समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी यापेक्षा थोडेसे वेगळे कार्य करून समाजापुढे एक नवा आदर्श उभा केलाय.
        याचं असं झालं की बुधवारचा दिवस, स्वेरी अभियांत्रिकीचे साधारण १०० विद्यार्थी एकत्र जमले आणि कोर्टी रोडलगत असलेल्या प्रभा-हिरा प्रतिष्ठान संचलित विशेष बालकांचे संगोपन केंद्र असलेल्या ‘पालवी’ कडे मार्गस्थ झाले. पालवीच्या आवारात चिमुकली मुले खेळत होती, बागडत होती. अचानक आलेल्या विद्यार्थ्यांना पाहून ती मुले थोडीशी कावरी-बावरी झाली. काही समजण्याच्या आत स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी ‘पालवी’च्या प्रमुख श्रीमती मंगलताई शहा यांच्याशी चर्चा करून ‘पालवी’तील सभागृहातच हा कार्यक्रम घेण्याचे ठरवले. सुरुवातीला गणेश बागल या विद्यार्थ्याने पुढे येऊन प्रास्ताविकात रक्षाबंधन पालवीमध्ये का साजरा करायचा? याबाबतचा हेतू स्पष्ट केला. पुढे स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील 'मेसा' (मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडन्टस असोसिएशन) च्या अध्यक्षा आरती चौगुले तसेच यांनी पालवीमध्ये येण्याचे प्रयोजन सांगितले. यानंतर चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह हळूहळू वाढत होता. ‘पालवी’च्या सचिवा डिंपल घाडगे यांनी आपल्या मनोगतात स्वेरीच्या आजच्या प्रयोजनाबाबत चिमुकल्यांना कल्पना दिली व त्यानंतर पालवीचा वचननामा सादर केला. ज्यामध्ये पालवी मधील विद्यार्थ्यांची कर्तव्य व जबाबदाऱ्या ऐकून स्वेरीच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या अंगावर शहारे उमटले. यानंतर पालवीच्या चिमुकल्यांनी स्वेरीच्या विद्यार्थ्यांना राख्या बांधल्या. यावेळी स्वेरीच्या विद्यार्थ्यांकडून त्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
         याप्रसंगी कांही विद्यार्थ्यांनी पालवीत चिमुकल्या हातांनी बनवलेल्या वस्तू , आकर्षक राख्या घेतल्या. त्याचबरोबर चिमुकल्यांना भेट म्हणून म्युझिक सिस्टीम, कॉम्प्युटर साहित्य, पेपर साहित्य आधी संबंधित मिळून जवळपास बारा हजार रुपयांच्या वस्तूंची मदत देऊ केली. संपूर्ण दिवस विद्यार्थ्यांनी पालवीतील मुलांसोबत घालविला. यावेळी चिमुकल्यांनी आपले कलागुणही सादर केले. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली, कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार यांच्या सहकार्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. श्रीकृष्ण भोसले व मेसाचे समन्वयक प्रा.संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली प्रा. एस.एम.वसेकर, विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून पार्थ रोंगे, पृथ्वीराज कन्हेरे, श्रुती इंगळे, अश्विनी वाघमारे यांच्यासह जवळपास शंभर विद्यार्थी- विद्यार्थिनी या कार्यक्रमाला उपस्थित होते. सदरचा कार्यक्रम स्वेरीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या ‘मेसा’ मार्फत घेण्यात आला. सूत्रसंचालन श्रुती इंगळे यांनी केले तर विद्यार्थी प्रतिनिधी ऋतुराज मोर्डे यांनी आभार मानले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)