पंढरपूर (प्रतिनिधी) - ग्राहक पंचायतीचे कार्य अत्यंत महत्त्वाचे असुन अशा संघटनेची समाजाला अत्यंत गरज आहे असे प्रतिपादन उमा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धीरजकुमार बाड यांनी केले.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा सोलापूरच्या वतीने ग्राहक पंचायतीच्या स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाची सुरुवात करण्यात आली. यानिमित्ताने आयोजित समारंभात ते बोलत होते. वर्षभरात घेण्यात येणाऱ्या ग्राहक प्रबोधन, जनजागृती उपक्रमाचा शुभारंभ पंढरपूर येथे उमा महाविद्यालयात झाला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ श्री.धीरजकुमार बाड यांच्या शुभहस्ते करण्यात आले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी ग्राहक पंचायतीचे प्रांत कोषाध्यक्ष विनोद भरते होते.
प्रारंभी ग्राहक पंचायतीचे आराध्य दैवत स्वामी विवेकानंद तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संस्थापक ग्राहकतीर्थ बिंदूमाधव जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य धीरजकुमार बाड यांच्या हस्ते करण्यात केले.
उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक प्रा.अविनाश देशपांडे यांनी केले. जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे स्थापनेपाठीमागची भूमिका व ६ सप्टेंबर १९७४ पासून आजपर्यंत केलेल्या कार्याची माहिती दिली. तसेच सध्याच्या काळात ग्राहक चळवळीचे महत्त्व विशद करून सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. जिल्हा संघटक दीपक इरकल यांनी उपस्थितांना ग्राहक संरक्षण कायदा १९८६ व सुधारित कायदा २०२० यांची विस्ताराने माहिती दिली. त्यामधील महत्त्वाचे अधिकार सांगून या कायद्याचा वापर करून विद्यार्थी ग्राहकांनी स्वतः सक्षम व्हावे व सामाजिक कार्य म्हणून या चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन केले.
प्रांत कोषाध्यक्ष विनोद भरते यांनी विविध उदाहरणांच्या साह्याने ग्राहक संरक्षण कायद्याचा वापर कसा करता येईल याबद्दल विस्तृत विवेचन केले. विद्यार्थी ग्राहक क्लबच्या माध्यमातून महाविद्यालयानेही ग्राहक चळवळीत सहभाग नोंदवावा असेही आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा सचिव सुहास निकते, जिल्हा कार्यकारणी सदस्य अण्णा ऐतवाडकर, पांडुरंग अलापूरकर गुरुजी, आझाद अल्लापुरकर, मकरंद पदमवार यांनी परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयाचे सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.समारंभासाठीअधिक्षक शशिकांत दुनाखे,जनसंपर्क अधिकारी सूर्यकांत पारखे यांचे सहकार्य लाभले.
यानिमित्त ग्राहक चळवळीचे माहिती पत्रक वितरीत करण्यात आले.
पंढरपूर तालुका अध्यक्ष विनय उपाध्ये यांनी समारंभासाठी उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले.