'नशिबाचे दुसरे नाव म्हणजेच कठीण परिश्रम' - माजी प्र. कुलगुरू डॉ.अशोक भोईटे

0
'स्वेरी' मध्ये शिक्षक दिन उत्साहात

         पंढरपूर (प्रतिनिधी) - ‘आजच्या युगात पालकांचे पाल्यांच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आजच्या या  स्पर्धेच्या युगात ‘हार्ड वर्क’ करून यशश्री खेचून आणली पाहीजे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम जे खूप अवघड वाटते ते सोपे केले पाहिजे, जे सोपे आहे ते सहज केले पाहिजे आणि जे सहज वाटते ते अधिक सुंदर कसे होईल याकडे लक्ष दिले पाहिजे  आणि त्यातून जे सुंदर निर्माण होते त्याचे जतन केले पाहिजे. कारण 'नशिबाचे दुसरे नाव म्हणजे कठीण परिश्रम' आहे. कठीण परिश्रमातून मिळणारा आनंद हा अवर्णनीय असतो.’ असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र. कुलगुरू व रयत शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. अशोक भोईटे यांनी केले.
       गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या भव्य खुल्या रंगमंचामध्ये भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची १३५ वी जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजिलेल्या ‘शिक्षक दिना’च्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र. कुलगुरू व रयत शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. अशोक भोईटे हे मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे हे होते. स्वेरीच्या सुमधुर गीताने व डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. संदेश फलकावरून प्र.कुलगुरू डॉ. भोईटे यांनी ‘हार्ड वर्क इज द अनादर नेम ऑफ लक’ हा संदेश विद्यार्थ्यांना दिला.
        प्रास्ताविकात संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे हे  पाहुण्यांचे स्वागत करून शिक्षकांचे समाजाच्या प्रगतीमध्ये असणारे योगदान स्पष्ट करताना म्हणाले की, ‘जिल्हा परिषदेच्या शाळेपासून ते महाविद्यालयीन व त्या पुढेही उच्च शिक्षणापर्यंत शिक्षण घेताना शिक्षकांचे योगदान हे खूप मोलाचे  असते. विद्यार्थ्यांच्या यशामुळे शिक्षकांना समाजात मानाचे स्थान मिळते. प्रत्येक शिक्षक हा विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी झटत असतो. शिक्षकांचे जीवनमान, राहणीमान कसेही असले तरी तो विद्यार्थ्याला यशस्वीतेकडे व प्रकाशाकडे नेत असतो.’ पुढे बोलताना प्र. कुलगुरू डॉ.अशोक भोईटे म्हणाले की, ‘गोरगरिबांचे शिक्षण पूर्ण होण्यासाठी राज्यात सर्वत्र ‘कमवा आणि शिका’ योजना आवश्यक आहे. स्वेरीचे यश पाहता प्रत्येक जण ‘माझं’ समजून कार्य करत असल्यामुळे आज स्वेरीला हे वैभव प्राप्त झाले आहे. शिक्षक हा नेतृत्व संपन्न, तत्ववेत्ता आणि योग्य मार्गदर्शक असावा यासाठी शिक्षण क्षेत्रात योगदान देताना प्रत्येक कार्य सकारात्मकपणे करणे आवश्यक आहे. 'सकारात्मकतेने केलेल्या कार्यात कधीच अपयश येत नाही' असे सांगून डॉ. भोईटे यांनी शिक्षण क्षेत्रातील थोर महात्म्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी विद्यार्थिनी क्षितिजा उराडे यांनीही शिक्षक दिनाचे महत्व पटवून दिले. अध्यक्ष स्थानावरून बोलताना संस्थेचे अध्यक्ष  दादासाहेब रोंगे म्हणाले की, ‘शिक्षक हा स्वतःमध्ये असलेल्या सामर्थ्याचा वापर विद्यार्थी घडविण्यासाठी करतो. शिक्षणाचा व्यापक अर्थ लक्षात  घेतला तर आपल्याला आई, वडील, भाऊ बहिण यांच्याकडून देखील शिक्षण मिळते. ज्या देशात शिक्षकांना मान सन्मान जास्त मिळतो तो देश सर्वात प्रगतशील असतो.’ असे सांगून त्यांनी एकलव्य पासून ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व  फातीमा शेख यांच्या शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकला. शिक्षक दिनाच्या निमित्ताने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शिक्षकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच्या ‘चांद्रयान-३’ च्या यशस्वी मोहिमेची हुबेहूब प्रतिकृती सादर केली. प्रा.संजय कणसे, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, विश्वस्त एच.एम.बागल, विश्वस्त बी.डी. रोंगे, युवा विश्वस्त प्रा.सुरज रोंगे, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार, संस्थेअंतर्गत असलेल्या डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.मिथुन मणियार, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा.सतिश मांडवे, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. सांस्कृतिक विभाग व संवाद प्रमुख डॉ.यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन करून सर्वांचे आभार मानले. शिक्षक दिनाच्या निमित्ताने आज दिवसभर महाविद्यालयाच्या परिसरात विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांना  शुभेच्छा देत होते.

शिक्षण' काय असते हे सांगताना डॉ.अशोक भोईटे म्हणाले की, ‘एज्युकेशन’ म्हणजे इ-इक्वालिटी, डी- डिफेन्स, यु- युनिव्हर्सल ब्रदरहुड, सी- कॅरॅक्टर, टी- टोलरंस- सहनशीलता, एन-नॅशनॅलीटी- देशप्रेम अशा प्रकारे कांही अत्यावश्यक गुणांचे मिश्रण आहे.’ याप्रकारे  ‘एज्युकेशन’ म्हणजे ‘विकृती’ नसून ‘संस्कृती’ आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)