पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर जिल्हा न्यायालयामध्ये दिनांक ९ सप्टेंबर, २०२३ रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीच्या अनुषंगाने दिनांक ४ ते ८ सप्टेंबर, २०२३ या कालावधीमध्ये विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते. या विशेष मोहिमेतर्गंत पंढरपूर न्यायालयातील एकुण २५८ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असल्याची माहिती तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश एम. बी. लंबे यांनी दिली.
फौजदारी प्रक्रिया संहिता कायदा कलम २५६ व २५८ ची एकुण ३४८ प्रकरणे दिनांक ४ ते ८ सप्टेंबर २०२३ या कालावधीमध्ये ठेवण्यात आलेली होती, त्यामध्ये एकुण २५८ प्रकरणांचा निपटारा करण्यात आलेला आहे. यामध्ये न्यायदंडाधिकारी पी. पी. बागुल यांनी ३२ पैकी २४ प्रकरणे, न्यायदंडाधिकारी ए. एस. सोनवलकर यांनी ५८ पैकी १३ प्रकरणे, न्यायदंडाधिकारी श्रीमती पी. एन. पठारे यांनी २८ पैकी २८ प्रकरणे तसेच सर्वाधिक जास्त श्रीमती एस. ए. साळुंखे यांनी २३० पैकी १९० प्रकरणांचा निपटारा करण्यात आलेला आहे.
विशेष मोहिमेतर्गंत आयोजनामुळे मोठ्या प्रमाणात छोट्या छोट्या प्रकरणांचा निपटारा होत असल्याने पक्षकार व विधीज्ञांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.