ई-फायलिंग प्रणालीमुळे होणार खर्चाची आणि वेळेची बचत - प्रमुख जिल्हा न्यायाधीश एम. एस. आजमी
पंढरपूर दि. (17):- ई- फायलिंग प्रणालीच्या माध्यमातुन विधीज्ञ किंवा पक्षकार यांना न्यायालयात न येता दिवाणी आणि इतर न्यायिक प्रकरणे दाखल करता येणार आहे. यामुळे पक्षकार, विधीज्ञ यांच्या वेळेची आणि खर्चाची बचत होणार असल्याचे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. आझमी यांनी केले.
जिल्हा न्यायालय पंढरपूर येथे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. आझमी यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा न्यायाधीश एम. बी. लंबे यांच्या उपस्थितीत ई-फायलिंग कक्षाचे उद्धाटन करण्यात आले. यावेळी बार कॉन्सील ऑफ महाराष्ट्र अॅन्ड गोवा चेअरमन अॅड.मिलिंद एस. थोबडे, पंढरपूर अधिवक्ता संघाचे अध्यक्ष अर्जुन पाटील, उपाध्यक्ष अॅड.शशिकांत घाडगे, सचिव अॅड.राहुल बोडके, प्रबंधक सौ. पी. पी. पैठणकर, अधिक्षक आर. एस. बेंबळकर, अधिक्षक श्री. चुंगे, सहा. अधिक्षक एस. एस. शिंदे, कुलकर्णी तसेच विधीज्ञ, पक्षकार व न्यायालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. आझमी यांनी म्हणाले, ई-फायलिंग प्रणाली ही उत्तम आहे. मात्र अनेकांना अद्याप खटले, दावे ऑनलाईन कसे दाखल करावयाचे, हे समजत नाही त्यामुळे ई-फायलिंग प्रणालीचा वापर करताना अनेक अडचणी येत आहेत. ही अडचण दूर करण्यासाठी प्रत्येक न्यायालयामध्ये ई-फायलिंगसाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. यामधुन कागदविरहित कामकाज होते, सातत्याने फाईल जवळ बाळगण्याची गरज नाही तसेच ई-फायलिंग पोर्टल मोबाईल, टॅबलेट यावरही वापरु शकता असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. आझमी यांनी पंढरपूर न्यायालयातील न्यायिक अधिकारी यांना मार्गदर्शन केले. तसेच येथे तयार होत असलेल्या ई-सेवा केंद्रास भेट देवुन अंतिम टप्पयात असलेल्या कामाचा आढावा घेतला. यावेळी पंढरपूर न्यायालयातील तयार होत असलेले ई-सेवा केंद्र प्रशस्त असलेबाबतचे गौरवोद्गार काढले. तद्नंतर पंढरपूर अधिवक्ता संघाच्या कार्यालयात भेट देवुन तरुण विधीज्ञांना ई-फायलिंगच्या मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल माहिती दिली.