पंढरपूर (प्रतिनिधी) – “भारतीय साहित्याला रामायण आणि महाभारतासारख्या महाकाव्याचा
वारसा लाभला आहे. त्याची परंपरा आजही अव्याहतपणे सुरु आहे. मानवी
जीवनातील आनंद द्विगुणीत करण्याची क्षमता साहित्यात असते. साहित्य हे
मनाला निखळ आनंद देत असते. त्यामुळे रसिक होवून साहित्याचा आस्वाद घेता
आला पाहिजे. जीवन समृद्ध करण्याची ताकद साहित्यात असते. साहित्य माणसाला विश्वाकडे पाहण्याची वैश्विक दृष्टी देते असे प्रतिपादन थोर समीक्षक व मराठीचे गाढे अभ्यासक प्राचार्य डॉ. उदय जाधव यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त
महाविद्यालयात रुसा काम्पो नंट आठ अंतर्गत वाङ्मय मंडळ उद्घाटन समारंभात
प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, उपप्राचार्य डॉ. भगवान
नाईकनवरे, अधिष्ठाता डॉ. बाळासाहेब बळवंत, मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ.
राजाराम राठोड, हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. फैमिदा विजापुरे, इंग्रजी
विभाग प्रमुख प्रा. डॉ. समाधान माने आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. उदय जाधव पुढे म्हणाले की, “माणूस हा या
विश्वाचा एक छोटासा घटक आहे. मात्र माणसाच्या अंगी विश्वाला समजून
घेण्याची जिज्ञासा असते. या जिज्ञासेने माणसाच्यामध्ये विविध कलांची
निर्मिती केली. साहित्य हा विविध कलांना कवेत घेणारा साहित्य प्रकार आहे.
कथा, कविता, नाटक, कादंबरी अशा साहित्य प्रकारातून मानवी भावभावनांचे भरण पोषण होत असते. साहित्य माणसाला जगायला शिकवते. जग समजून देण्याची ताकद
साहित्यात असते. विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती अंगीकारून साहित्य समजून घेतले तर त्यांचे जीवन समृद्ध होण्याचा मार्ग सुकर होईल.”
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे म्हणाले की, “सध्या मोबाईल मध्ये विद्यार्थी आणि समाज गुंतून गेला आहे. त्यामुळे वाचनाकडे थोडा कल कमी झाला आहे. विद्यार्थ्यांनी आपल्यातील रसिकता विकसित करणे आवश्यक आहे. साहित्य, कला, चित्रपट आणि नाटक यामध्ये समाजाला बदलण्याची, त्यात सुधारणा करण्याची शक्ती असते. जगभरात झालेल्या सर्व क्रांत्या ह्या साहित्यामुळेच झालेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी समाज परिवर्तन आणि स्वत:च्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी रसिक होणे आवश्यक आहे.”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि प्रमुख पाहुण्यांचा परिचय वाङ्मय मंडळाचे प्रमुख प्रा. धनंजय वाघदरे यांनी करून दिला. या कार्यक्रमास डॉ. रमेश शिंदे, डॉ. प्रशांत नलवडे, डॉ. धनंजय साठे, सिनिअर महाविद्यालयातील सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भारती सुडके यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. सोमनाथ व्यवहारे यांनी मानले.