पंढरीत दि. ५ ते ८ ऑक्टोबर दरम्यान चार संतांच्या नाटकांचे मोफत आयोजन
पंढरपूर (प्रतिनिधी) - विज्ञानाने प्रगती केली परंतु त्या बरोबरच समाजामध्ये धार्मिक तेढ, आतंकवाद, व्देष, हिंसाचार, नैतिक अध:पतन होत असून यावर संतांच्या विचाराचा प्रचार व प्रसार हाच एकमेव उपाय आहे. हा उद्दात्त हेतू घेऊनच कार्य करणाऱ्या बालयोगी श्री सदानंद महाराज नाट्य मंडळाच्या वतीने पंढरपूर येथे दि. ५ ते ८ ऑक्टोबर या दरम्यान चार संतांच्या नाटकांचे मोफत आयोजन करण्यात आले आहे.
संत तनपुरे महाराज मठात गुरूवार ५ ते रविवार ८ रोजी रात्री आठ वाजता सदर नाटकं होणार आहेत. याबाबत माहिती देण्यासाठी संत तनपुरे महाराज मठात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यास नाटकाचे लेखक बालयोगी सदानंद महाराज, महंत मोहनदास महाराज, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माजी अध्यक्षा ज्योती ठाकरे, नाटकाचे निर्माते मनोज राऊत, संत साहित्य अभ्यासक प्र. दी. निकते, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष काशिनाथ थिटे, अॅड. आशितोष बडवे, विश्वनाथ वारिंगे, नाट्य मंडळाचे विश्वस्त संजय भंडारी आदी उपस्थित होते.
यामध्ये गुरूवारी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवनावर माउली, शुक्रवारी संत नामदेव यांच्यावर विठु नामयाचा, शनिवारी संत चोखामेळा यांच्यावरील चोखा विठुचा तर रविवारी संत प्रल्हाद महाराज बडवे यांच्यावरील अमृतगाथा नाटकाचे प्रयोग होणार आहेत. ही सर्व नाटके मोफत असून यास तरुणांनी उपस्थित रहावे यासाठी विविध शाळा, महाविद्यालयात आयोजक भेट घेऊन आवाहन करणार आहेत.
पालघर जिल्ह्यात सदानंद महाराज यांचे सामाजिक कार्य असून या बरोबरच संत विचाराचा ते प्रसार करतात. संताची समता, बंधुता ही शिकवण समाजातील सर्वस्तरामध्ये पोहचविण्याचा त्यांचा संकल्प आहे. यासाठी त्यांनी महाराष्ट्रासह काशी, हरिव्दार, व्दारका, वृंदावन, जगन्नाथ पुरी आदींसह परदेशात देखील संत ज्ञानेश्वरी, संत तुकाराम गाथा याचे सप्ताह भरविले होते. या ठिकाणी त्यांनी सदर संतांची नाटके हिंदी मध्ये सादर करून संतांचा व पंढरीचा महिमा पोहचविला आहे. पंढरीतील संत प्रल्हाद महाराज बडवे यांचे कार्य देखील जगा समोर येण्यासाठी प्रथमच अमृतगाथा हे नाटक सादर केले जाणार आहे.
सदर नाटकांचे दिग्दर्शन मुंबई येथील उपेंद्र दाते यांनी केले असून विविध ४० हून अधिक कलाकार हे संगीत नाटक सादर करणार आहेत. याचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.