पंढरपूर- गोपाळपूर येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी उद्योजकता मार्गदर्शन शिबीर नुकतेच संपन्न झाले. तीन दिवस चाललेल्या या शिबिरात मान्यवरांनी उद्योजकतेबाबत बहुमोल मार्गदर्शन करून ‘नोकरीच्या मागे न लागता उद्योग-धंद्यात करिअर करा’ असा संदेश दिला.
ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या स्वेरी मध्ये विविध उपक्रम राबवले जातात. अशाच उपक्रमांचा एक भाग म्हणून हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. या मार्गदर्शन शिबिराच्या पहिल्या दिवशी प्रथम सत्रात मार्गदर्शक रामचंद्र वाघमारे यांनी भारतामध्ये प्रचलित असलेल्या उद्योजकतेबद्दल माहिती दिली आणि आज उद्योग स्थापनेसाठी आणि तो टिकवण्यासाठी काय करावे लागते याबाबत सविस्तर माहिती दिली. दुसऱ्या सत्रात एमसीइडी सोलापूर येथील प्रकल्प अधिकारी राजशेखर शिंदे यांनी ‘उद्योजकता व जिल्हा उद्योग केंद्राची इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांबाबतीत असलेली भूमिका स्पष्ट केली तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्याकडून मिळणाऱ्या सबसिडी बाबत सविस्तर माहिती सांगितली. दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात पुणे येथील जिल्हा उद्योग केंद्राचे प्रकल्प अधिकारी सूर्यकांत माढे यांनी उद्योगासाठी लागणाऱ्या आर्थिक बाबींवर चर्चा केली. यामध्ये प्रकल्प अहवाल बनविणे, प्रकल्प मंजूर करणे याबाबत आवश्यक माहिती देवून त्याचे प्रात्यक्षिक करुन दाखविले. दुपारच्या सत्रात कोल्हापूर येथील उद्योजक संजय पाटील यांनी बाजारपेठ व्यवस्थापन (मार्केटींग मॅनेंजमेंट) याबाबत माहिती दिली. तिसऱ्या व अखेरच्या दिवशी सोलापूर येथील उद्योजक अरविंद जोशी यांनी उद्योग जगतात यशस्वी होण्यासाठी उपलब्ध असलेल्या संधीबाबत मार्गदर्शन केले तसेच बिना भांडवल अथवा कमी भांडवलामध्ये उद्योग कसा सुरु करावा? यावर अभ्यासपूर्ण माहिती दिली. दुसऱ्या सत्रात पंढरपूर मधील कर सल्लागार अक्षय शहा यांनी उत्पादन शुल्काबाबत माहिती दिली. तसेच उद्योग करत असताना शासनाकडून उद्योगास मिळत असलेल्या कर सवलतीबाबत मार्गदर्शन केले. अभियांत्रिकी पदवी प्राप्त केल्यानंतर विद्यार्थ्यांना नोकरीच्या मागे न लागता उद्योगात भरारी घेण्यासाठी हे शिबीर फायदेशीर ठरणार आहे, हे मात्र नक्की. या तीन दिवसीय शिबिराला विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. उद्योग धंदे उभारणीबाबत अनेकांनी प्रश्न विचारले असता प्रकल्प अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे दिली. यावेळी सारथी फॉउंडेशन सोलापूरचे प्रकल्प अधिकारी रामचंद्र वाघमारे, सौ.अमृता पालवे, वर्कशॉप इन्चार्ज प्रा. बी.डी. गायकवाड, समन्वयक प्रा.शशिकांत कांबळे, प्रा.शांतीसागर ताकपेरे, प्रा.मनोज देशमुख आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार यांच्या सहकार्याने इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.