कामावरील निष्ठा व चांगुलपणातून शिक्षकांना श्रेष्ठत्व - ला.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके

0
लायन्स क्लब, म.सा.प., नगर वाचन मंदिर व सांगोला विद्यामंदिर तर्फे सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार
         सांगोला (प्रतिनिधी) - आज शिक्षण  क्षेत्रात विविध प्रकारचे बदल घडत आहेत. हे बदल घडत असताना विद्यार्थ्यांच्या गुणात्मकतेचा आलेख कसा वाढेल याकडे प्राधान्याने लक्ष देत त्याचा सामाजिक, भावनिक पातळीवरचा विकास साधण्यासाठी शिक्षक  आपल्याकडील चांगुलपणाद्वारे निष्ठा ठेवून कार्य करतात त्यामुळेच त्यांचे कार्य श्रेष्ठ ठरते असे प्रतिपादन माजी प्रांतपाल, म‌.सा.प., नगर वाचन मंदिर सांगोला अध्यक्ष ला.प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांनी केले. लायन्स क्लब ऑफ सांगोला,महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सांगोला,नगर वाचन मंदिर सांगोला व सांगोला विद्यामंदिर सांगोला यांचे संयुक्त विद्यमाने ५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त सांगोला विद्यामंदिर सांगोला येथे  सेवानिवृत्त शिक्षकाच्या  सत्कार समारंभामध्ये अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
         यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव म.शं.घोंगडे, सांगोला विद्यामंदिरचे प्राचार्य गंगाधर घोंगडे, लायन्स झोन चेअरमन  ला.प्रा. धनाजी चव्हाण, सांगोला लायन्स क्लबचे अध्यक्ष ला. उन्मेश आटपाडीकर, सेवानिवृत्त शिक्षक रामचंद्र बेहेरे, भिमाशंकर  पैलवान, नारायण विसापूरे, लक्ष्मण जांगळे  उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन व कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांचे प्रतिमा पूजनाने झाली. नंतर सेवानिवृत्त शिक्षकांना शाल,पुष्पहार,पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी सांगोला विद्यामंदिरचे ज्युनिअर कॉलेजचे ला प्रा. धनाजी चव्हाण यांचा लोकमंगल शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
          पुढे बोलताना प्रा. झपके म्हणाले, समाजाची जडणघडण योग्य होण्यासाठी शिक्षकाचे कार्य महत्त्वाचे आहे. माझ्या तीन पिढ्या शिक्षकी पेशात आहेत याचा मला अभिमान आहे.असे सांगत आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले तर त्याचे आपल्याला समाधान लाभेल. यासाठी शिक्षकांनी नीतीमूल्ये जपली पाहिजेत असे सांगितले. यावेळी सत्काराला उत्तर देताना सेवानिवृत्त प्राचार्य भीमाशंकर पैलवान, नारायण विसापूरे, लक्ष्मण जांगळे यांनी आपल्या मनोगतात शिक्षक दिनाचे महत्त्व, शिक्षकांचे कार्य सांगत  पूज्य बापूसाहेब व झपके  कुटुंबीयांबद्दल   कृतज्ञता व्यक्त करत सांगोला विद्यामंदिरमध्ये शिक्षक म्हणून व पदाधिकारी म्हणून कार्य करण्याची संधी मिळाली याबद्दलचा आम्हाला नेहमी अभिमान आहे असे सांगितले.  
      सदर कार्यक्रमाला लायन्स क्लबचे सर्व पदाधिकारी, सदस्य, म.सा.प. सांगोला सर्व पदाधिकारी, सदस्य, नगर वाचन मंदिर सांगोला पदाधिकारी, सदस्य, सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्रशासकीय अधिकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत लायन्स क्लबचे अध्यक्ष ला.उन्मेश आटपाडीकर  यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ला.प्रा. शिवशंकर तटाळे  यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक पोपट  केदार यांनी केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)