मंगळवेढा (प्रतिनिधी) - मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागाच्या जनतेला वरदायिनी असणाऱ्या म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून येत्या १४ सप्टेंबर २०२३ पासून या योजनेअंतर्गत लाभक्षेत्र असणाऱ्या गावांसाठी पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे.
यंदा मंगळवेढा तालुक्यामध्ये पावसाने दडी मारल्याने व कडक उन्हाच्या तीव्रतेमुळे खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना पेरणी केलेली पिके पाण्याअभावी वाळू लागली आहेत. जगाचा पोशिंदा असणारा बळीराजा या सर्व नैसर्गिक संकटाच्या पार्श्वभूमीवर हवालदिल झाला असताना आ आवताडे यांनी मागील काही दिवसांपासून या योजनेचे पाणी सोडण्यासाठी शासन दरबारी तसेच जलसंपदा विभागाकडे आपला प्रत्यक्षपणे व पत्रव्यवहावराच्या माध्यमातून पाठपुरावा सुरु ठेवला होता.
गुरुवारी, राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर येथे झालेल्या जिल्हा नियोजन समिती बैठकीमध्ये आ आवताडे यांनी शेतकऱ्यांची पाण्याअभावी होणारी घालमेल आणि तालुक्यातील एकूण दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यातील जनतेसमोर उभ्या ठाकलेल्या समस्या व अडचणी यांचा पाढा वाचला होता. आ आवताडे यांचा या योजनेसंदर्भात असणारा रेटा व शेतकऱ्यांचे सामूहिक हित लक्षात घेऊन सांगली जिल्हा जलसंपदा विभाग अन्वये म्हैसाळ कालवे उपविभाग वितरिका क्रमांक-२ यांच्या माध्यमातून या योजनेअंतर्गत लोणार, महमदाबाद (हु), मारोळी, जंगलगी, चिखलगी, पौट, सलगर (खु), सलगर (बु) यांचा पूर्व भाग, आसबेवाडी, सोड्डी, शिवणगी, येळगी या गावातील शेतकऱ्यांना पाणी सोडण्याचे आदेश मंत्री महोदय यांनी संबधित अधिकारी व विभागांना दिले होते. त्या आदेशानुसार कार्यवाही होऊन येत्या गुरुवार पासून हे पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच शिरनांदगी, पडोळकरवाडी, मारोळी, लवंगी येथील साठवण तलाव आणि छोटे पाझर तलाव, ओढ्यावर असेलेले सिमेंट बंधारेही या योजनेच्या पाण्यातून भरले जाणार आहेत.
दुष्काळी तालुका अशी ओळख असणाऱ्या मंगळवेढा तालुक्यातील जनतेच्या दरोडाई उत्त्पन्नाचे एकमेव साधन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीसाठी हे पाणी आल्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून अर्थिक आवक असलेल्या दुग्ध व्यवसाय वाढीवर याचा फार मोठा सकारात्मक परिणाम होईल. पाणी सिंचन योजनेचे अत्यल्प शेतीक्षेत्र असणाऱ्या या भागामध्ये म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या सुटणाऱ्या पाण्यामुळे जनावरांच्या चाऱ्यासाठी तसेच पशुधन जगविण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये दिलासादायक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होणार आहे.