पुणे दि. २५ (प्रतिनिधी) - शिक्षण, विश्वशांती, विश्वकल्याण व मानवतेच्या सेवेसाठी केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांना ‘ज्युवेल ऑफ भारत’ अर्थात ‘भारत देशाचे अनमोल रत्न’ या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना हा पुरस्कार जगविख्यात प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे प्रदान करण्यात आला.
आबू रोड येथील शांतीवन कॅम्पसमध्ये २२ ते २५ सप्टेंबर रोजी आयोजित ‘नवीन युगासाठी दैवी ज्ञान’ या विषयावरील ग्लोबल समिट २०२३ मध्ये ब्रह्माकुमारी संस्थेच्या प्रमुख राजयोगिनी बी.के. जयंती दिदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी उत्तर प्रदेश येथील कृषी मंत्री सुर्य प्रताप साही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच आमदार निरज शर्मा, बीसीसीआयचे सदस्य पी.व्ही.शेट्टी, बी.के सुप्रिया दिदी, पीटर कुमार, राजयोगिनी बी.के. चक्रधर, नोयडा येथील अमर उजालाचे संपादक जयदीप कर्णीक, बी.के.आतम प्रकाश, बी.के मोहिनी दिदी उपस्थित होत्या.
सत्काराला उत्तर देतांना प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, ज्ञानाचा प्रकाश ज्या रथात समावलेला आहे तो भारत देश आहे. वसुधैव कुटुंबकम चा संदेश देऊन या भारताने संपूर्ण जगाला एका सूत्रात बांधले आहे. जीवन कसे जगावे आणि कसे जगू नये याचा संदेश सर्व धर्मग्रंथांनी दिलेला आहे. संत ज्ञानेश्वर यांनी वयाच्या १६ व्या वर्षी संपूर्ण विश्वाचे चिंतन करून मानवजातीला सुखी व समाधानी राहण्याचा मार्ग दाखविला आहे.
विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी १९८३ मध्ये माईर्स एमआयटी शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यांनतर चार दशकांच्या कालावधीत संस्थेच्या अंतर्गत पाच आंतरराष्ट्रीय दर्जाची विद्यापीठे व ७२ इतर शिक्षण संस्थांचे वटवृक्ष उभे केले. युनेस्को या आंतरराष्ट्रीय संघटनेचे शांती, लोकशाही व मानवाधिकारसाठीचे डॉ. कराड यांना अध्यासन बहाल करण्यात आले. त्यांच्या ह्या संकल्पनेने व पुरस्काराने महान तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि श्री. तुकाराम महाराज यांच्या नावाने जगातील सर्वात मोठा विश्वशांतीचा घुमट, आळंदी येथे सुंदर व शाश्वत असे घाट, १४५ फूट उंचीचा गुरूडस्तंभ, विश्वधर्मी श्री राम रहीम मानवता सेतू आणि तथागत भगवान गौतम बुध्द विहाराची निर्मिती करून मानव जातीच्या कल्याणासाठी व विश्वात शांती नांदावी यांसाठी ते कार्य करीत आहेत.