पंढरपूर-सातारा रस्त्यावर 10 किलोमीटर पर्यंत लागल्या वाहनांच्या रांगा

0
उपरी येथे रास्ता रोको

तरुण व ग्रामस्थांसह महिलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश

          पंढरपूर (प्रतिनिधी) -  आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील सकल मराठा समाज आक्रमक झाला असून मोठ्या प्रमाणात उग्र आंदोलन केले जात आहे. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे परंतु उपरी तालुका पंढरपूर येथील सकल मराठा समाजाच्या ग्रामस्थांनी अहिंसा व  लोकशाहीच्या मार्गाने रस्ता रोको करून सरकारला आरक्षणाबाबत निर्वाणीचा इशारा  देत ग्रामस्थांनी एकत्र येत मतदानावर बहिष्कार टाकण्याची सामुदायिक शपथ घेतली आहे.
           राज्यामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीचा मोठा वनवा पेटला आहे, उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी व मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी उपरी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने पंढरपूर-सातारा रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलन दरम्यान मोठ्या प्रमाणात नागरिक, महिला व तरुण मोठ्या संख्येने आंदोलनात उतरल्यामुळे मोठ्या प्रमाणात चक्काजाम झाला होता.
 पंढरपूर-सातारा रस्त्यावर १० किलोमीटर लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे पहावयास मिळाले.

            या आंदोलनाला मुस्लिम समाज बांधव, आरपीआय आठवले गट, प्रकाश आंबेडकर गट, कोळी महासंघ, अण्णाभाऊ साठे युवक मंडळ यांच्यासह गावातील सर्वच सामाजिक व राजकीय संघटनांनी  आपला पाठिंबा दिला या आंदोलनात एक वर्षाच्या लहान मुलापासून ते 90 वर्षांच्या आजीबाईपर्यंत मोठ्या संख्येने तरुण, महिला उपस्थित होते. महिलांनीही आंदोलनामध्ये मोठा सहभाग घेतला असल्याचे पहावयास मिळाले.

       एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे, या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेल्याचे पहावयास मिळाले.या आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पंढरपूर ग्रामीण पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त देण्यात आला होता.
          सुमारे एक ते दीड तास झालेल्या या आंदोलनामुळे पंढरपूर-सातारा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चक्काजाम झाल्याचे ही पहावयास मिळाले. आंदोलनानंतर उपस्थित महिलांनी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना निवेदन दिले. आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी सामुदायिक शपथ घेत मतदानावर आपला बहिष्कार टाकला तसेच आजपर्यंत मराठा आरक्षणासाठी यांनी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या सर्वांना याप्रसंगी श्रद्धांजली वाहण्यात आली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)