विद्यार्थ्यांनी न्यूनगंड दूर करून इंग्रजी भाषा अवगत करावी – डॉ. रूपा शहा

0
         पंढरपूर (प्रतिनिधी)  - “इंग्रजी भाषा ही ज्ञानाची भाषा असून ती जागतिक भाषा म्हणून ओळखली जाते. विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेचे कौशल्य आत्मसात केले तर त्यांना या स्पर्धेच्या युगामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी निश्चित उपलब्ध होतील. म्हणून ग्रामीण भागातील मुलांनी आपल्यातील न्यूनगंड दूर ठेवून इंग्रजी भाषा अवगत केली पाहिजे.” असे मत पुणे येथील प्रतिभा कॉलेजच्या इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. रूपा शहा व्यक्त केले.

         येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात रूसा कंपोनंट-आठ अंतर्गत इंग्रजी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या "इंग्रजी विषयाच्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी व मार्गदर्शन" या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत
खिलारे हे होते.

         डॉ. रूपा शहा पुढे म्हणाल्या की, “भाषांतर, स्क्रिप्ट रायटिंग, जाहिरात
लेखन, ब्लॉक राइटिंग यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी यामध्ये करिअर करावे. इंग्रजी भाषेच्या कौशल्यामुळे करिअरच्या संधी व्यापक प्रमाणात उपलब्ध होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषा अवगत करावी. असे आवाहन त्यांनी केले.

            या कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रामध्ये कॉर्पोरेट ट्रेनर किरण पटमासे, अस्पायरिंग करिअर प्रायव्हेट लिमिटेड, पुणे यांनी इंग्रजी भाषा, रोजगार आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील रोजगारासाठी आवश्यक कौशल्य या विषयावर मार्गदर्शन केले. ‘त्यांनी इंग्रजी भाषेबरोबर इंग्रजीचे ज्ञान, दृष्टिकोन, व्यक्तिमत्त्वाचा विकास ,वाचन, लेखन इत्यादीचे महत्त्व
विद्यार्थ्यांना सांगितले.’

            तिसऱ्या सत्रामध्ये पुणे येथील लेखक व दूरदर्शनचे सूत्रसंचालक ज्ञानेश्वर जाधवर यांनी इंग्रजी साहित्य आणि मिडियामधील संधी या विषयावर मागदर्शन केले. ‘शोध, निरीक्षण आणि सर्जनशीलतेच्या माध्यमातून
विद्यार्थी साहित्य आणि मिडियामध्ये करिअर घडवू शकतात.’ असे मत व्यक्त
केले. यावेळी त्यांनी वेगवेगळे शब्द, म्हणी, उखाणा जाहिराती, फिल्म, सूत्रसंचालन व सर्जनशीलता याचे दाखले दिले.

       या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. समाधान माने
यांनी केले व प्रा. प्रवीण शिंदे पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी
महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. बजरंग शितोळे यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमासाठी प्रा. धनंजय वाघदारे, प्रा.सुहास शिंदे, प्रा. सोमनाथ
व्यवहारे, प्रा. सैफ विजापूर, प्रा. श्रीधर रेवजे, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बहुसंख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कुबेर गायकवाड यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. धनंजय साठे यांनी मानले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)