हिंदू महासभेच्या वतीने हिंदुत्व शौर्य गौरव पुरस्कारचे दि.१९ रोजी वितरण
पंढरपूर (प्रतिनिधी) - आम्ही हिंदुत्ववादी आहोत, हिंदू धर्म - संस्कृतीचा आम्हाला अभिमान आहे असं सांगणारे पुष्कळ भेटतील. परंतु या हिंदुत्वासाठी कृतीशील योगदान देणारे खूप कमी भेटतात. कारण हिंदुत्व ही बोलण्याची गोष्ट नसून करण्याची गोष्ट आहे हे अनेकजण लक्षात घेत नाहीत. परंतु बोलण्यापेक्षा कृतीवर भर देणारे हिंदू समाजाच्या मनामध्ये स्थान निर्माण करतात. हिंदू समाजाच्या मनामध्ये स्थान निर्माण करणारी अशीच एक व्यक्ती म्हणजेच हिंदूराष्ट्र सेनेचे संस्थापक मा.श्री.धनंजयभाई देसाई होय.
घरातील संस्काराचे वातावरण व मुळातच धर्म व राष्ट्र याबद्दल मनात अतीव श्रद्धा असणारा धनंजय हा बालपणापासूनच छोट्या-मोठ्या कार्याने सर्व परिचित झाला. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी हिंदू समाजावरील होणारे हल्ले दूर करण्याच्या हेतूने त्याने आपल्यासारख्या विचारांच्या मित्रांचे संघटन केले व त्या माध्यमातून छोटे-मोठे उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. अत्यंत आक्रमक स्वभाव व धाडसाने कोणतीही कृती करण्याची तयारी यामुळे साहजिकच ते शिवसेनेसारख्या पक्षाकडे खेचले गेले. स्व.श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर विश्वास ठेवून ते कार्यरत झाले. धनंजयभाईंच्या धडाडीच्या कार्यामुळे स्व.श्री.बाळासाहेब ठाकरे देखील अत्यंत खूष होते. हिंदुत्वावर होणारा हल्ला परतवायचा असेल तर आपण स्वतंत्रपणे काम केले पाहिजे या विचारातूनच त्यांनी हिंदुराष्ट्र सेनेची स्थापना केली.
आपणच स्थापन केलेल्या संघटनेमध्ये काय असायला पाहिजे व काय करायला पाहिजे याचे धनंजयभाईंना स्वातंत्र्य होते, त्यामुळेच त्यांनी आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी आवश्यक ती कार्यप्रणाली विकसित केली व संपूर्ण महाराष्ट्रभर हजारो तरुणांना या कार्यासाठी जोडून घेतले.राष्ट्राभिमान व धर्माभिमान या दोन गोष्टींना महत्त्व देऊन हिंदूराष्ट्र सेनेचे कार्य चालते. देशाविरुद्ध काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला धडा शिकविणे व हिंदू धर्माबद्दल अपशब्द बोलणाऱ्या किंवा कृती करणाऱ्यांना योग्य ती शिक्षा देणे यासाठी हिंदूराष्ट्र सेना कार्यरत आहे.
सन १९९२ च्या बॉम्बस्फोटानंतर मुंबईत झालेल्या हिंदू - मुस्लिम दंग्यामध्ये स्वतः धनंजयभाईंनी अशा प्रकारे काम केले, की पोलीस यंत्रणेला खरे गुन्हेगार पकडून दिले गेले व यातूनच हिंदू समाजाचे रक्षणही झाले. धनंजयभाईंच्या या कृतीमुळे देशविद्रोही काम करणारे जे लोक पकडले गेले अथवा मारले गेले याचा राग म्हणून कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याने धनंजयभाईंना मारण्याची सुपारी दिली, यातच धनंजयभाईंचे धाडस, राष्ट्रप्रेम व धर्मप्रेम दिसून येते.
धनंजयभाईंनी आपल्या कार्यासाठी पुणे शहराची निवड केल्यानंतर पुण्यातील प्रत्येक कार्यक्रमातून त्यांनी हिंदू धर्माभिमान जागृत करण्याचा प्रयत्न केला. हिंदू समाजासाठी लढवय्या असणाऱ्या धनंजयभाईंना मोठे समर्थन मिळत असल्याचे पाहून त्यांच्यावर अनेक खोट्या केसेस करून त्यांना तुरुंगातही पाठविले गेले. परंतु अनेक प्रकरणात ते निर्दोष सुटले, त्यांच्याविरुद्ध पोलिसांना पुरावे मिळू शकले नाहीत. कधी प्रक्षोभक बोलण्याबद्दलची नोटीस तर कधी एखादा कार्यक्रम उधळून दिल्याबद्दलची नोटीस, कधी एखाद्या वृत्तवाहिनीच्या कार्यालयावर हल्ला केल्याबाबतची नोटीस तर कधी हिंदू मुलींना पळवून नेणाऱ्यांना चोप दिल्याबद्दलची नोटीस, अशा एकामागून एक सातत्याने त्यांना कायदेशीर नोटिसा येत गेल्या व आजही येत आहेत. परंतु आपल्या राष्ट्रासाठी व हिंदू धर्मासाठी सतत कृतिशील कार्य करणाऱ्या धनंजयभाईंनी या देशाला हिंदूराष्ट्र बनवण्याचे स्वप्न पाहिले आहे व ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी हिंदूराष्ट्र सेनेच्या माध्यमातून ते कार्यरत आहे.
अशा हिंदुत्वासाठी शौर्य गाजवणाऱ्या धनंजयभाईंना क्रांतिवीर वसंतदादा बडवे ट्रस्ट व पंढरपूर हिंदू महासभा यांचे वतीने "हिंदुत्व शौर्य गौरव पुरस्कार" गुरुवार दि.१९/१०/२०२३ रोजी सायं.६ वा. कवठेकर प्रशाला, नाथ चौक पंढरपूर* येथे प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते देण्यात येणार आहे. या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन हिंदू महासभा पंढरपूर यांचे वतीने करण्यात येत आहे.