दुष्काळी यादीत तालुक्याचा समावेश होणार.. मुख्यमंत्र्याचे आश्वासन
मंगळवेढा (प्रतिनिधी) - ट्रिगर च्या आधारे निकष लावून नुकतीच दुष्काळी तालुक्यांची यादी जाहीर झाली आहे. या यादीमधून सात ऑक्टोबर 2017 च्या शासन निर्णयातील निकषानुसार मंगळवेढा तालुक्याचे नाव वगळल्याचे दिसून येत आहे तरी मंगळवेढा तालुका हा आवर्षण प्रवण तालुका आहे. मोठ्या प्रमाणावर पावसाचा खंड पडल्याने हंगाम वाया गेला आहे 50% पेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले असल्याचा अहवाल ही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे तात्काळ दुष्काळ यादीमध्ये तालुक्याचा समावेश करावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असून मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ मदत व पुनर्वसन विभागाच्या सचिवांना सूचना देऊन अहवाल मागवून घेतला आहे अशी माहिती आमदार समाधान आवताडे यांनी बोलताना दिली.
आ. आवताडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्रामध्ये असे म्हटले आहे की मंगळवेढा तालुक्यामध्ये सध्या चाऱ्याची परिस्थिती गंभीर झाली असून मिळत त्या भावाने पशुपालक चारा मागवत आहेत. तालुक्यातील ओढे, नाले, तलाव, विहिरी हे नैसर्गिक स्त्रोत पावसाने न भरल्यामुळे कोरडे ठप्प आहेत परिणामी भूजल पातळीमध्ये कोणतीही वाढ झाली नसून हजार ते बाराशे फुटाच्या खाली पाणी पातळी गेली आहे त्यामुळे येथील शेतकरी व नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन करावी लागत आहे
तालुक्यामध्ये दररोज चार ते साडेचार लाख लिटर दूध संकलन होत असून त्या जनावरांना साडेचार ते पाच हजार रुपये मेट्रिक टन दराने बाहेरून ऊस घेऊन घालावा लागत आहे गेल्या महिन्यात मी केलेल्या गावभेट दौऱ्यामध्ये सुद्धा शेतकरी पशुपालक चारा डेपो किंवा चारा छावणी सुरू करा अशी मागणी करत होते त्यानुसार याआगोदरही आपल्याकडे व उपमुख्यमंत्री यांच्याकडे लेखी पत्रव्यवहार केला आहे.तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून मंगळवेढा तालुक्याचा दुष्काळग्रस्त किंवा टंचाईग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करावा अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ ते पत्र मदत व पुनर्वसन विभागाकडे वर्ग करून अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत अशी माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली.