पंढरपूर तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश करा - काँग्रेस माथाडी विभागाची मागणी

0
           पंढरपूर (प्रतिनिधी) - राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळी तालुक्यांची यादीतून पंढरपूर तालुक्याला वगळण्यात आले असून वास्तव  परिस्थिती पाहता पंढरपूर तालुक्याचा दुष्काळी यादीमध्ये समावेश करावा. अशी मागणी काँग्रेसच्या  माथाडी कामगार विभागाचे जिल्हाध्यक्ष अशोक पाटोळे यांनी निवेदनाद्वारे  केली आहे.
          अशोक पाटोळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंढरपूर तालुक्यांमध्ये यंदाच्या पावसाळ्यात पावसाने दडी दिली असून यामुळे शेतकऱ्यांची पिके वाया गेली आहेत. तर तालुक्यात अनेक ठिकाणी पाणी पातळी खालावल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही उद्भवताना दिसून येत आहे. जून ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये 50 टक्के पेक्षा कमी पाऊसमान झाल्याचे दिसून येत आहे. तर गेली अनेक दिवसांपासून पावसाने खंड दिल्याने अनेक शेतकऱ्यांची पिके जळून चाललेली आहेत.
        नवीन पिक लागवडीसाठी शेतकऱ्यांनी लागवड पूर्व तयारी पूर्ण केली असली तरी पावसाचा पत्ता नसल्यामुळे लागवडीचा हंगाम पूर्णपणे ढासळला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळल्याचे दिसून येत आहे.
         पंढरपूर तालुक्यातील या वास्तवदर्शी दुष्काळी परिस्थितीचा विचार करून सरकारने व शासनाने या तालुक्याचा दुष्काळी यादीमध्ये समावेश करणे अत्यंत क्रमप्राप्त असतानाही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून तालुक्याला दुष्काळी यादीतून हटवले आहे. यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांना व जनतेला टंचाईग्रस्त सुविधांपासून वंचित राहावे लागणार आहे.
    याचा विचार करून पंढरपूर तालुक्याचा दुष्काळी यादीमध्ये समावेश करावा आणि दुष्काळाच्या खाईत लोटलेल्या शेतकऱ्यांना  सुविधांसह मदतीचा दिलासा द्यावा. अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  काँग्रेसच्या माथाडी विभागाचे जिल्हाध्यक्ष  अशोक पाटोळे यांनी तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. 

तात्काळ पिक विमा द्यावा...
      राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी जाहीर केलेल्या एक रुपया मध्ये पिक विमा या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. त्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ तात्काळ द्यावा. म्हणजे दुष्काळी संकटामध्ये सापडलेल्या शेतकऱ्याला थोड्याफार प्रमाणात तरी आर्थिक दिलासा मिळण्यास मदत होईल. अशी मागणी ही निवेदनाद्वारे अशोक पाटोळे यांनी केली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)