इस्रोच्या 'गगनयान मिशन'चे चाचणी उड्डाण यशस्वी

0

           श्रीहरिकोटा (वृत्तसंस्था) - भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) महत्वपूर्ण मानवी अवकाश मोहिमेच्या तयारीसाठीची पहिली चाचणी आज (शनिवार) यशस्वी करण्यात आली. 'टेस्ट व्हेईकल (टीव्ही-डी१) या एकाच टप्प्यातील इंधन रॉकेटचे प्रक्षेपण आज सकाळी १० वाजता करण्यात आले.
         ‘गगनयान' या भारताच्या मानवी अवकाश मोहिमेत अंतराळवीरांच्या सुरक्षेची खात्री 'टीव्ही- डी१'मधील 'क्रू मोड्यूल'द्वारे घेण्यात आली. या चाचणी उड्डाणाच्या यशामुळे उर्वरित चाचण्या आणि मानवरहित मोहिमांचा मार्ग मोकळा झाला आहे.

         भारतीय अंतराळवीरांच्या पहिल्या गगनयान मोहिमेसाठी या चाचण्या महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. गगनयान मोहीम २०२५ मध्ये प्रत्यक्षात येण्याची अपेक्षा आहे.
         'टीव्ही - डी१'मध्ये सुधारित विकास इंजिनाचा समावेश केलेला असून त्याच्या पुढील भागात 'क्रू मोड्यूल' आणि 'क्रू एस्केप सिस्टिम' ही उपकरणे बसविण्यात आली आहेत. हे यान ३४.९ मीटर उंच आहे आणि त्याचे वजन ४४ टन आहे. 

     सुरुवातीला सकाळी ८ वाजता प्रक्षेपण होणार होते, मात्र खराब हवामानामुळे प्रक्षेपणाची वेळ बदलून सकाळी ८.४५ करण्यात आली. मात्र त्यानंतर इंजिन योग्यरित्या प्रज्वलित झाले नाही. त्यानंतर इस्रोकडून तांत्रिक अडचण दूर करण्यात आली आणि १० वाजता यशस्वी उड्डाण करण्यात आले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)