आनंदाचा शिधा २५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर पर्यंत वितरित करणार
मुंबई (वृत्तसंस्था ) - शिधापत्रिकाधारकांना दिवाळीनिमित्त शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या शिध्यात आता मैदा आणि पोह्याचा देखील समावेश करण्यात आला आहे. पूर्वी आनंदाचा शिधा या संचात रवा, चनाडाळ, साखर आणि खाद्यतेल असे ४ जिन्नस होते. मात्र आता यामध्ये दोन जिन्नसांची भर पडली आहे.
यामध्ये १ किलो साखर, १ लिटर खाद्यतेल तसेच प्रत्येकी अर्धा किलो रवा, चनाडाळ, मैदा आणि पोहे असा शिधा राहील. हा आनंदाचा शिधा २५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर पर्यंत वितरित करण्यात येईल. यासाठी येणाऱ्या एकूण ५३० कोटी १९ लाख इतक्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली. हा आनंदाचा शिधा १ कोटी ६६ लाख ७१ हजार ४८० शिधापत्रिकाधारकांना मिळेल.
राज्य सरकारने देऊ केलेला आनंदाचा शिधा खऱ्या अर्थाने दिवाळीचा आनंद द्विगुणित करणारा असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.