उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शुभहस्ते ओझर येथे उदघाटन
पंढरपूर (प्रतिनिधी) - अखिल भारतीय ग्राहक पंचायत सुवर्णमहोत्सवी वर्षारंभाचा समारंभ दि. ७ व ८ ऑक्टोंबर रोजी श्रीक्षेत्र ओझर येथे होत असल्याची माहिती सोलापूर जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास व संघटक दीपक इरकल यांनी दिली.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या स्थापनेला ४९ वर्षे पूर्ण होत असून २०२३-२४ हे ५०वे वर्ष सुरू होत आहे. या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा शुभारंभ सोहळा श्रीक्षेत्र ओझर येथे दि.७ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. हा समारंभ अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायणभाई शाह यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे.
या वेळी राज्यभरातुन सुमारे १००० पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. तसेच समारोप समारंभ दि.८ रोजी राज्याचे तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून न्यायमूर्ती सुरेंद्रजी तावडे,अध्यक्ष राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय संघटनमंत्री दिनकरजी सबनीस व खासदार अमोल कोल्हे उपस्थित राहणार आहेत. तसेच राज्य पातळीवरील परिवहन, महावितरण,आरोग्य, सेवा हमी विभाग, पोलीस, सायबर,वैधमापन अशा विविध खात्याचे अधिकारी तसेच ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक, राष्ट्रीय सचिव अरुण देशपांडे,रा.स्व.संघाचे प्रांत कार्यवाह प्रविण दबडगाव, राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे इ.उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी प्रांत अध्यक्ष बाळासाहेब औटी, संघटक प्रसाद बुरांडे, सचिव संदीप जंगम परिश्रम घेत आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील ८० पदाधिकारी व कार्यकर्ते यासाठी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती प्रांत उपाध्यक्ष भालचंद्र पाठक, कोषाध्यक्ष विनोद भरते, सदस्य सुभाष सरदेशमुख, जिल्हा सचिव सुहास निकते यांनी दिली.