एकूण तीन शाखांमधून स्वेरीत ही संधी उपलब्ध
पंढरपूर (प्रतिनिधी) - ‘डिप्लोमा इंजिनिअरिंग अर्थात पदविका अभियांत्रिकी उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थी हे आर्थिक परिस्थितीमुळे अथवा इतर कारणांमुळे पदवीचे शिक्षण न घेता नोकरी करणे पसंत करतात. अशा नोकरी लागलेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्याची इच्छा असूनही पुढील पदवीचे शिक्षण घेता येत नाही, ही अनेक वर्षांची गरज ओळखून शासनाने स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंडळामार्फत डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना पदवीचे शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आता अशा विद्यार्थ्यांना पदवीच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळणार आहे. प्रवेशानंतर विद्यार्थ्यांना वर्गात सक्तीने बसावेच असे बंधन नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना पदवीचे शिक्षणही आता घेता येणार आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण संचालनालया मार्फत पदविकेनंतर नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी एक नवीन संधी निर्माण करून देण्यात आलेली आहे. नव्याने काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार स्वेरी अभियांत्रिकी मध्ये कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग (३०), इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग (३०) आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग (३०) अशा क्षमतेने प्रवेश घेण्याची सुविधा देण्यात आली आहे. पदविका उत्तीर्ण होवून रोजगार करत असलेल्या विद्यार्थ्यांना या पदवी अभ्यासक्रमांच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश घेता येणार आहे. सदर कोर्सेस साठी प्रवेशोत्स्तुक विद्यार्थी हा केंद्र किंवा राज्य शासनाच्या नोंदणीकृत संस्थेमध्ये अथवा उद्योगांमध्ये महाविद्यालयापासून पन्नास किलोमीटरच्या परिसरामध्ये कार्यरत असणे आवश्यक आहे. सदर विद्यार्थ्याला कामाचा कमीत कमी एक वर्षाचा पूर्ण वेळ अनुभव असणे आवश्यक आहे. हे प्रवेश तंत्रशिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. असे विद्यार्थी येत्या २५ ऑक्टोबर, २०२३ पर्यंत पदवी अभियांत्रिकेच्या थेट द्वितीय वर्षासाठी प्रवेश घेऊ शकतात. सदर प्रवेशासाठी व अधिक माहितीसाठी स्वेरी अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता प्रा.करण पाटील (मोबा.नं.-९५९५९२११५४ ) व थेट द्वितीय वर्ष प्रवेशाचे समन्वयक प्रा.पोपट आसबे (मोबा.नं.- ७८२१००४६४७) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.