युवा महोत्सवात सुमारे ६० महाविद्यालये आणि जवळपास १६०० पेक्षा जास्त विद्यार्थी कलाकारांचा सहभाग.
19 व्या युवा महोत्सवासाठी "स्वेरी कला पंढरी" सज्ज
मुख्य रंगमंचाला कला वारकरी मुख्य रंगमंच, तर लोककलेच्या रंगमंचाला प्रसिद्ध लोककलावंत लावणीसम्राट कै. ज्ञानोबा (माऊली) यांचे नाव देण्यात आले
पंढरपूर दि.८ (प्रतिनिधी) - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा १९ वा युवा महोत्सव पंढरपूर येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे मंगळवार, दि. १० ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी दहा वाजता होणार असून मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडणार असल्याची माहिती स्वेरीचे संस्थपक व सचिव तथा स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूरचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मंगळवारी सकाळी दहा वाजता सोलापूर लोकसभेचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे विभागप्रमुख व युवा लोककलावंत डॉ. गणेश चंदनशिवे, सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चवरे यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. अध्यक्षस्थानी पु. अ. हो. सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर हे असतील. दि. १० ते १३ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत नृत्य, नाट्य, ललित वाङ्मय, संगीत व लोककला विभागातील एकूण ३९ कलाप्रकारांच्या स्पर्धा या युवा महोत्सवात होणार आहेत. सुमारे ६० महाविद्यालये आणि जवळपास १६०० पेक्षा जास्त विद्यार्थी कलाकारांचा यामध्ये सहभाग राहील असा अंदाज आहे.
स्वेरीच्या युवा चेतना रॅलीने काही प्रातिनिधिक महाविद्यालयात जाऊन विद्यार्थी कलावंतांना व रसिकांना या युवा महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. विद्यार्थी कलावंतांनी या युवा चेतना रॅलीला भरघोस प्रतिसाद दिला आहे.
युवा महोत्सवाच्या पहिल्या दिवशी मंगळवार, दि. १० ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता रजिस्ट्रेशन, उद्घाटन समारंभ, संघ व्यवस्थापकांची बैठक झाल्यानंतर स्पर्धाना सुरुवात होईल. मूकनाट्य, समूहगीत, कातरकाम, भजन, प्रश्नमंजुषा (लेखी), मराठी-हिंदी-इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा, भारुड, काव्यवाचन, भितीचित्रण, मेहंदी, लावणी आणि एकांकिकेचे सादरीकरण महोत्सवाच्या पहिल्या दिवशी होणार आहे.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी बुधवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी शास्त्रीय नृत्य, सुगम गायन, पोवाडा, पथनाट्य, स्थळचित्रण, वादविवाद, लोक वाद्यवृंद, जलसा, शास्त्रीय सुरवादद्य, कथाकथन, मिमिक्री, व्यंगचित्र, कव्वाली आणि एकांकिका आदी स्पर्धा पार पडतील. गुरुवार दि. १२ ऑक्टोबर रोजी प्रश्नमंजुषा (तोंडी), निर्मिती चित्र, शास्त्रीय गायन, पाश्चात्य समूहगायन, प्रहसन, पाश्चिमात्य वादन, रांगोळी, शास्त्रीय तालवाद्य, मातीकाम आणि लोकनृत्याच्या स्पर्धा रंगतील शुक्रवार, दि. १३ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ८ वाजता शोभायात्रा पार पडल्यानंतर दुपारी एक वाजता पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार समाधान आवताडे आणि युवा अभिनेत्री सोनाली पाटील यांच्या शुभहस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण केले जाणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर हे असतील तर कुलसचिव योगिनी घारे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा.देवानंद चिलवंत आणि वित्त व लेखाधिकारी सीए श्रेणिक शहा यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती राहणार आहे.