पंढरपूर 23 -कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी सुमारे 8 ते 10 लाख भाविक येतात.या यात्रा कालावधीत दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत गेलेली असते. दर्शन रांगेत आसणाऱ्या भाविकांना वैद्यकीय तसेच आवश्यक सुविधा तात्काळ उपलब्ध व्हाव्यात यासाठी स्काय वॉक व दर्शन रांगेत आपत्कालिन मार्गाची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी गजानन गुरव, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी पाहणी वेळी दिली.
कार्तिकी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधाबाबतची पाहणी प्रांताधिकारी गजानन गुरव, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केली यावेळी त्यांच्या समवेत मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव, अतिरिक्त कार्यकारी अभियंता भिकाजी भोळे, मंदीर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, आरोग्य अधिकारी डॉ. प्रसन्न भातलवंडे, न.पाचे प्रभारी आरोग्य अधिकारी शरद वाघमारे , पोलीस उपनिरिक्षिक श्री.घुगरकर उपस्थित होते.
कार्तिक शुध्द एकादशीच्या शासकीय महापुजेच्या वेळी मुख दर्शन रांग सुरु ठेवण्यात येणार असून, या मुखदर्शन रांगेच्या नियोजनाबातची पाहणी तसेच मंदीर, दर्शन मंडप, स्काय वॉक, दर्शन रांग, पत्रा शेड, वाळवंट, विष्णूपद बंधारा, गोपाळपूर,65 एकर या ठिकाणची पाहणी प्रांताधिकारी गजानन गुरव व मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी पाहणी केली.
कार्तिकी यात्रा कालावधीत वारकरी सांप्रदाच्या प्रथा परंपरेप्रमाणे चंद्रभागा वाळवंटात भजन व किर्तन करण्यासाठी मा.उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये शुध्द नवमी ते शुध्द पोर्णिमेपर्यंत तंबू / मंडपासाठी परवानगी देण्यात आली असल्याने वाळवंट परिसराची व घाटाची वेळोवेळी स्वच्छता करावी. नदी पात्रातील घाटावर आवश्यक ठिकाणी बॅरेकेटींग करावे. 65 एकर मध्ये स्वच्छता, पाणी, प्रकाश व्यवस्था तसेच दिंड्यांना प्लॉटचे वाटप करण्यासाठी नियोजन करावे. मंदीर परिसरातील धोकादायक असणाऱ्या वीज तारांची पाहणी करुन दुरुस्ती करावी, रोहित्रांना सुरक्षा कवच बसवावेत, विष्णूपद बंधाऱ्यावरती तत्काळ लोखंडी गेट टाकावेत, अशा सुचना प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी यावेळी दिल्या.