‘ट्रेड एक्स्पो २०२३’ मधून विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक कौशल्यांचा विकास - खा. डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी

0
स्वेरीत ‘ट्रेड एक्स्पो २०२३’ संपन्न 

           पंढरपूर (प्रतिनिधी) - ‘स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या एमबीए या विभागाने  आयोजित केलेल्या ‘ट्रेड एक्स्पो २०२३’ या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक कौशल्यांच्या विकासास चालना मिळते. या मेळाव्याच्या माध्यमातून  स्वेरीने विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ निर्माण करून दिले आहे त्यामुळे एमबीए मधील विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच बाहेरील विश्वातील आवश्यक असणारे ज्ञान या उपक्रमामुळे मिळते. बाहेरील जगामध्ये वस्तूंची खरेदी-विक्री कशी केली जाते, याबाबतचे व्यवहार ज्ञान या ‘ट्रेड एक्स्पो’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारे मिळते.’ असे प्रतिपादन सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी केले. 
       गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या  एम.बी.ए. विभागातर्फे विद्यार्थ्यांना  अभ्यासाचाच एक भाग म्हणून वेगवेगळ्या विषयावरील प्रात्यक्षिकाकरिता ‘ट्रेड एक्स्पो २०२३’ या कृषी व ग्राहक मेळाव्याचे आयोजन केले होते. ऐन युवा महोत्सवात या उपक्रमाचे आयोजन केल्यामुळे याला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. ‘ट्रेड एक्स्पो २०२३’चे उदघाटन सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते विद्यार्थ्यांच्या या  उपक्रमाविषयी मार्गदर्शन करत होते. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरचे नूतन कुलगुरू डॉ.प्रकाश महानवर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी एमबीए विभागप्रमुख प्रा.करण पाटील यांनी ‘ट्रेड एक्स्पो २०२३’ या उपक्रमाची तसेच सहभागी कंपन्या, खरेदी-विक्री, प्रदर्शन याविषयी माहिती दिली.  यावेळी कुलगुरू डॉ. महानवर म्हणाले की, ‘युवा महोत्सवात अधिक करून युवक वर्गाचा सहभाग असतो. त्यांनी आपली कला सादर केल्यानंतर विद्यार्थ्यांना  कॅम्पसमधील ‘ट्रेड एक्स्पो २०२३’ सारख्या आकर्षक आणि विधायक उपक्रमाला भेट देण्याचा मोह नक्कीच  आवरता येणार नाही. अशा उपक्रमांची पाहणी केल्यास त्यांना पुढील कला सादर करण्यासाठी  अधिक उर्जा मिळते आणि जनरल नॉलेज मध्ये देखील भर पडते.  त्यामुळे स्वेरीच्या एमबीए विभागाच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे युवकांकडून निश्चितच  भव्य स्वागत होईल.’ ऐन ‘युवा महोत्सवा’त केलेल्या या आयोजनामुळे चारही दिवस ‘ट्रेड एक्स्पो २०२३’ ला अक्षरशः जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. एमबीए अभ्यासक्रमासाठी अत्यावश्यक असलेल्या या ‘ट्रेड एक्स्पो २०२३’ च्या उत्साहवर्धक मेळाव्यातून सहभागी कंपन्याची लाखो रुपयांपर्यंतची उलाढाल झाली. या सहभागी कंपन्यांमध्ये कृषी, विमा, खते, बी-बियाणे, कपडे, ज्वेलरी, मोबाईल व साहित्य, गृहोपयोगी साहित्य, खाद्यपदार्थ, मिठाई पासून ते टू व्हिलर, ट्रॅक्टरसह फोर व्हिलर पर्यंतची वाहने विक्री व प्रदर्शनासाठी उपलब्ध करण्यात आली होती. यावेळी लहान - मोठया वाहनांच्या खरेदीसाठी बुकिंग करण्यात आले.  ‘ट्रेड एक्स्पो २०२३’ या मेळाव्यात लहान मोठ्या मिळून जवळपास पन्नास विविध कंपन्यांचे सदस्य आपल्या उत्पादनांचे महत्व पटवून देत होते. या ‘ट्रेड एक्स्पो २०२३’ या मेळाव्याला चार दिवसात जवळपास २५ हजार ग्राहकांनी भेटी दिल्या. हा मेळावा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख प्रा.करण पाटील यांच्या नेतृत्वाखाली एमबीए विभागातील प्राध्यापक, शिक्षेकतर कर्मचारी यांच्यासह सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमातून बाहेरील जगात संवाद कसा साधायचा आणि व्यवहार कसे करावेत याचे शिक्षण एमबीए च्या विद्यार्थ्यांना मिळाले.  प्रत्येक दिवशी ग्राहकांची संख्या वाढत गेल्यामुळे अखेरच्या दिवशी वस्तू उत्पादन कंपन्यांनी व ग्राहकांनी आणखी दोन दिवस वाढवून मिळण्याचा आग्रह धरला परंतु एमबीए अभ्यासक्रमाच्या दृष्टीने  आणखी दिवस वाढविणे अशक्य असल्याचे संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी सांगितले. ‘ट्रेड एक्स्पो २०२३’ या  उपक्रमाने अधिक गर्दी खेचून ‘युवा महोत्सवा’त  वेगळे चैतन्य निर्माण केले, हे मात्र नक्की.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)