पुतण्याच्या प्रयत्नांनी काका थेट सरपंचपदी..
विश्वराज महाडिक यांच्या नेतृत्वात पुळूज ग्रामपंचायत बिनविरोध.
पंढरपूर (प्रतिनिधी) - संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या पंढरपूर तालुक्यातील पुळूज गावची ग्रामपंचायत निवडणूक भीमा कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांच्या प्रयत्नांमुळे ३५ वर्षांत पहिल्यांदाच बिनविरोध झाली आहे. विश्वराज यांचे काका विश्वास विष्णुपंत महाडिक यांची लोकनियुक्त सरपंचपदी निवड झाल्याने पुतण्याच्या प्रयत्नांनी काका थेट सरपंचपदी विराजमान होण्याचा योगायोग घडून आला आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली हि प्रक्रिया पार पडली.
३५ वर्षांपासून पुळूज ग्रामपंचायतीमध्ये महाडिक गटाची एकहाती सत्ता आहे. खासदार महाडिक यांनी सन २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची जबाबदारी चेअरमन विश्वराज महाडिक यांच्याकडे सोपवली होती. भीमा, राजाराम कारखाना निवडणुकीनंतर पुळूज ग्रामपंचायत बिनविरोध करत विश्वराज महाडिक यांनी विश्वस्तपर्व कायम केले आहे.
पुळूज ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचा मी आभारी आहे. राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वावर असलेल्या ग्रामस्थांच्या विश्वासामुळेच हि निवडणूक बिनविरोध झाली. जागृत ग्रामदैवत लिंगेश्वराच्या कृपेने निवडणूक बिनविरोध झाल्याने गावचा एकोपा अजूनही वाढेल याची मला खात्री आहे. निवडून आलेल्या सर्वच नवनियुक्त सदस्यांचे अभिनंदन. ज्यांनी या निवडणुकीत साहेबांच्या शब्दाला मान देत माघार घेतली त्या सर्वांचा देखील मी विशेष आभारी आहे. असे विश्वराज महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.