अकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालयास युवा महोत्सवाचे विजेतेपद

0
शिवाजी कॉलेजला दुसरे तर दयानंदला तिसरे बक्षीस

पंढरपूर (प्रतिनिधी) - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या १९ व्या युवा महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपदाचे प्रथम पारितोषक ११४ गुणांसह अकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालयाने पटकावले. दुसऱ्या क्रमांकाचे सर्वसाधारण विजेतेपद ७४ गुणांसह बार्शीचे शिवाजी कॉलेज तर  ६१ गुण घेऊन दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयाने तिसरे पारितोषिक मिळविले.
         स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पंढरपूर येथे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा युवा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. शुक्रवारी पारितोषिक वितरण झाले. पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे व अभिनेत्री सोनाली पाटील यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. 
       विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम झाला. कुलसचिवा योगिनी घारे, संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, राजाभाऊ सरवदे, एम. डी. कमळे,   सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील, सूरज रोंगे, संस्थेचे माजी अध्यक्ष कागदे, चंदाताई तिवाडी, प्राचार्य डॉ. एन. बी. पवार, चन्नवीर बंकुर, डॉ. प्रभाकर कोळेकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे, गोपाळपूरचे सरपंच मस्के यांच्यासह युवा महोत्सव समिती सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पडला. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. 
         ललित, वांग्मय, नाट्य या तिन्ही विभागाचे विजेतेपद शंकरराव मोहिते महाविद्यालयाने पटकावले. नृत्य विभागाचे पारितोषिक संगमेश्वर महाविद्यालयास मिळाला. संगीत विभागाचे सर्वसाधारण विजेतेपद शिवाजी कॉलेजला मिळाले. लोककला विभागाचे विजेतेपद शंकरराव मोहिते महाविद्यालय आणि दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयास विभागून देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि पारितोषिकाचे वाचन डॉ. यशपाल खेडकर यांनी केले तर आभार प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी मानले.
तेजस्विनी केंद्रे गोल्डन गर्ल तर
नागनाथ साळवे गोल्डन बॉय
युवा महोत्सवात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनीस गोल्डन गर्ल तर विद्यार्थ्यास गोल्डन बॉयचा किताब दिला जातो. यंदाच्या गोल्डन गर्लची मानकरी अकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालयाची विद्यार्थिनी तेजस्विनी केंद्रे तर गोल्डन बॉयचा किताब अकलूजचाच शंकराव मोहिते महाविद्यालयाचा विद्यार्थी नागनाथ साळवे यांनी पटकाविला. मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)