पंढरपूर (प्रतिनिधी) - "श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ केवळ पूजेचा ग्रंथ नसून त्यामध्ये मानवी जीवनातील सर्व प्रश्नासंबंधाने मार्गदर्शन केले आहे. हा ग्रंथ समस्त मानव कल्याणाचे सूत्र मांडणारा असून राजकारण, धर्मकारण, अर्थकारण, शिक्षण आणि आरोग्य या संबंधी या ग्रंथात महत्त्वाचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. या ग्रंथात भगवान श्रीकृष्णानी आहार शास्त्रावर केलेले भाष्य आपल्या दीर्घ आणि आरोग्यपूर्ण आयुष्यासाठी महत्त्वाचा मापदंड ठरणारा आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी हा ग्रंथ समजून घेवून आहार आणि आरोग्य या बाबीचे आचरण करावे. आहार हा आरोग्यावर प्रभाव टाकणारा महत्त्वाचा घटक आहे.” असे प्रतिपादन योगशिक्षक प्रा सुनील ननवरे यांनी केले,
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात रुसा काम्पोनंट आठ अंतर्गत
हेल्थ अँड हायजीन' या विषयावर आयोजित आठ दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेत 'आहार नियंत्रण व आरोग्य' या विषयावर ते मार्गदर्शन करत होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे हे होते. प्रा. सुनील ननवरे पुढे म्हणाले की, श्रीमद भगवद गीतेने त्रिगुणात्मक आहाराची माहिती दिली आहे. 'राजस, तामस आणि सात्विक' हे प्रकार होत. सात्विक आहार हा मानवासाठी अत्यंत उपयुक्त आहार असून तो इतर आहारापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. मीठ, मिर्ची आणि मसाले ही औषधे आहेत. त्याचा औषध म्हणूनच उपयोग व्हायला हवा. सध्या मोठ्या प्रमाणात मसालेदार पदार्थाचा आहारात वापर होत असल्याने त्याचे पचन संस्थेवर विपरीत परिणाम होत आहेत.
सध्याची पिढी फास्टफूड अन्नाचे मोठ्या प्रमाणात सेवन करत असल्याने विविध आजारांना बळी पडताना दिसतात.
व्यायाम आणि आहाराचा आरोग्याची थेट संबंध असतो. त्यामुळे आरोग्यदायी जीवनासाठी युवकांनी सजग राहिले
पाहिजे.”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि प्रमुख पाहुण्यांचा परिचय शारीरिक संचालक डॉ. सचिन येलभर यांनी करून दिला. या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. बजरंग शितोळे, उपप्राचार्य डॉ. भगवान नाईकनवरे, उपप्राचार्य राजेश कवडे, अधिष्ठाता डॉ. बाळासाहेब बळवंत, अधिष्ठाता डॉ. अनिल चोपडे, इतिहास विभाग प्रमुख डॉ. हनुमंत लोंढे, हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. फैमिदा विजापुरे, इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. समाधान माने, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुशीलकुमार शिंदे, डॉ. रमेश
शिंदे, डॉ. धनंजय साठे, सिनिअर महाविद्यालयातील सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. दत्तात्रय डांगे यांनी मानले.